
शहरात अजूनही २ हजार खड्डे
पुणे, ता. ६ : गेल्या वर्षभरापासून पुणेकर रस्त्यांमधील खड्ड्यांमधून कसरत करीत मार्गक्रमण करीत असताना रस्ते खोदाई मात्र सुरूच आहे. असे असताना गेल्या चार महिन्यांत महापालिकेच्या पथ विभागाने ९ हजार खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. अद्यापही २ हजारांपेक्षा अधिक खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे.
शहरात समान पाणी पुरवठा, मोबाईल केबल, गॅस पाइप, विद्युत केबल, सांडपाणी वाहिनी यांसह इतर कारणांनी दरवर्षी शेकडो किलोमीटरची रस्ते खोदाई होते. हे रस्ते दुरुस्तीचे काम महापालिका तसेच ठेकेदार दोघांकडूनही केले जाते. मात्र रस्ता पुर्ववत करताना काही ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकले गेले आहे, तर काही ठिकाणी डांबरीकरण केले जाते. डांबरावर सिमेंट न बसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एकीकडे रस्ते खोदाईमुळे रस्ते खराब झालेले असताना दुसरीकडे डांबरीकरण केलेल्या रस्त्याची मुदत संपणे, डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करणे, खड्ड्यातील माती, दगड न काढता तसेच डांबर टाकणे, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था न करता डांबरीकरण करणे आदी कारणाने रस्ते खराब होत आहेत.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्त्याची डागडुजी, खड्डे बुजविणे यासह इतर कारणासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय सुमारे १.२५ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. त्यातून वर्षभर ही कामे केली जातात. मुख्य पथ विभागाकडे शहरातील १२ मिटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते येतात, तर त्याखालील रस्त्यांची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. मुख्य खात्याची विभागणी पूर्व व पश्चिम अशा दोन विभागांत झाली आहे. त्यानुसार हे खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. तसेच आदर पुनावाला क्लीनसिटी इनेशिएटिव्हच्या माध्यमातून खड्डे बुजविले जात आहेत.
----------
शहराच्या विविध भागांत खड्डे पडल्याच्या तक्रारी येतात. पथ विभागाचे अधिकारीही रस्त्याचे सर्वेक्षण करतात. त्यातून खड्ड्यांची आकडेवारी निश्चित केली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकातील तरतूदीद्वारे ही कामे केली जातात. उर्वरित दोन हजार खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल. - साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग
-----------
माझी पत्नी गरोदर असून, दवाखान्यात किंवा इतर कामांसाठी बाहेर जाताना खड्डेमय रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. असा त्रास शहरातील अनेक नागरिक सहन करीत आहे, पण महापालिका याबाबत संवेदनशीलपणे विचार करत नाही. -अनिकेत राठी, नागरिक
--------------------
तक्ता
---------------
विभाग पडलेले खड्डे - बुजविलेले खड्डे
पूर्व भाग - ९५०६ -७९२२
पश्चिम भाग - १६७९ - १३०१
एकूण - १११८५ - ९२२३
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60778 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..