
फक्त जागा बदलली नशिबी कोंडीचा तापच
पुणे, ता. ५ ः नळस्टॉप चौकातील मुख्य रस्त्यांवर सायंकाळी वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, त्या वाहतूक कोंडीने अजूनही कोथरूडकरांची पाठ सोडलेली नाही. बोलार्ड व बॅरिकेट्समुळे वाहतूक कोंडीचे स्थलांतर झाले असून आता गुळवणी महाराज रस्ता, सीडीएसएस रस्त्यांवर सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. नव्या बदलामुळे वाहन चालकांना सुमारे दीड ते दोन किमीचा फेरा पडत आहे. यात वीस ते तीस मिनिटे वाया जात आहे.
कर्वे रस्त्यांवरील उड्डाणपुलामुळे नळस्टॉप चौक ते कर्वे नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने पाळंदे कुरिअर, लागू बंधू च्या गल्लीत बोलार्ड व बॅरिकेटिंग केले. या दोन रस्त्यावरून मुख्य रस्त्यांवर येण्यास चारचाकी वाहनांना अटकाव झाला. त्यामुळे आता चारचाकी चालकांना सत्यम इंडस्ट्री, गुळवणी महाराज रस्ता, सीडीएसएस मार्गे करिष्मा सोसायटी चौकातून कोथरूड गाठावे लागते. यात वेळ वाया जातो. कोंडीमुळे वाहनधारकच नाहीतर परिसरातील रहिवाशांना देखील प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत आहे.
ही वेळ मनस्तापाची
उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहन धारकांना याचा त्रास नाही. मात्र, खालून जाणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभरात वाहतूक सुरळीत असते. सायंकाळी सहा ते रात्री आठच्या दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी होते. आता नळस्टॉप चौकात जरी कोंडी होत नसली तरीही सत्यम इंडस्ट्री, सीडीएसएस रस्ता, गुळवणी रस्ता व करिष्मा सोसायटी या भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत रस्त्यावरून प्रवास करणे टाळले पाहिजे.
काय आहे कोंडीचे कारण?
नळस्टॉप चौकातील कोंडी दूर करण्यासाठी सारस्वत बँक, शंकरराव जोशी पथ, रेसलॉन रस्ता आदी भागात बोलार्ड व बॅरिकेड लावण्यात आले आहे. यामुळे चारचाकी नागरिकांना पांडुरंग कॉलनी, सत्यम इंडस्ट्री मार्गे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या गल्ल्या अगदी अरुंद आहेत. त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वाहने येथून जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अशीच परिस्थिती गुळवणी महाराज रस्त्यांवर होत आहे. हा रस्ता देखील तुलनेने लहान आहे. त्यामुळे या रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी रस्ता वाढवावा लागणार आहे.
काय आहेत उपाय?
मेहेंदळे गॅरेज चौक, गुळवणी महाराज चौक तसेच सीडीएसएस रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून हा रस्ता मोठा करणे, लागू बंधूच्या गल्लीत दुचाकीला देखील मज्जाव केला आहे. तिथले बॅरिकेट्स काढून तिथे बोलार्ड लावावे. जेणेकरून दुचाकी चालकांना तिथून जाता येईल. यामुळे काही अंशी तरी पांडुरंग कॉलनी व सत्यम इंडस्ट्री येथे होणारी दुचाकीची गर्दी कमी होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60792 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..