
मेहंदी ब्लाऊजची नवी क्रेझ
अक्षता पवार : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ : फॅशनच्या दुनियेत काय घडेल याची कल्पना करणेही मुश्कील काम. मग ते कपडे असो किंवा ज्वेलरी. याबाबींचे अनोखे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक भन्नाट ट्रेंड सध्या समाज माध्यमांवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजेच मेहंदीचा. जी मेहंदी हातावर, पायावर किंवा केसांवर लावली जात होती, ती चक्क आता ब्लाऊज बनली आहे. होय फॅशनच्या या अजब दुनियेत मेहंदी ब्लाऊजच्या चर्चेने जोर धरला आहे.
लग्न सोहळे म्हटलं की, नवरीचे हात व पायांवर सुरेख मेहंदी काढली जाते. पण आता नववधू मेहंदी ब्लाऊजला पसंती देत या नव्या ट्रेंडला फॉलो करत आहेत. याबाबत मेहंदी आर्टिस्ट धनश्री हेंद्रे यांनी म्हणाल्या, ‘‘सध्या बॅकलेस चोली किंवा ब्लाऊजची फॅशन मोठ्या प्रमाणात आहे. अशात बॅकलेस ब्लाऊज सहजपणे घालता यावे यासाठी बऱ्याच महिला अशा प्रकारच्या मेहंदी ब्लाऊज काढून घेतात. यामध्ये पाठीवर निरनिराळ्या डिझाईन साकारण्यात येतात. अलीकडेच याकडे कल वाढला आहे. यामध्ये लहान, मोठी आवडीनुसार मेहंदीची डिझाईन काढली जाते.’’
गर्भवतींनाही क्रेझ
लग्नाप्रमाणे डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी सध्या मेहंदीचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये गर्भवती महिलांच्या ‘बेबी बंप’वर म्हणजेच पोटावर मेहंदीच्या वेगवेगळ्या डिझाईन साकारल्या जातात. याचा काही दुष्परिणाम होत नाही, मात्र आराम आणि थोडा ‘कुलिंग इफेक्ट’चा अनुभव अशा गर्भवती महिलांना होतो.
रिल्स करण्यावर भर
समाज माध्यमांवर असे बरेच व्हिडिओ, रिल्स व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर आपापल्या मेहंदीचे व्हिडिओ व रिल्स तयार करत समाज माध्यमाद्वारे लाइक्स मिळविण्यावर भर देत आहेत. त्याचबरोबर ‘नेक मेहंदी’ला ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये गळा व मानेवर मेहंदीच्या विविध डिझाईन साकारल्या जातात. पर्मनंट टॅटूला पर्याय म्हणून नेक मेहंदी काढली जाते.
कोरोना काळात घरातच असल्यामुळे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील घरगुतीच केला. बेबी बंपवर मेहंदीच्या ट्रेंड बद्दल ऐकले व व्हिडिओ पाहिले होते, त्यात काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी देखील हे करण्याचे ठरविले. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्यांनी देखील हे सुरक्षित असल्याचे सांगितले. यासाठी नैसर्गिक मेहंदीचाच वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
- प्रीती वडे, वाघोली
पर्यटनासाठी आम्ही मैत्रिणी गोव्याला जाण्याचे ठरविले. त्यात बॅकलेस ड्रेसेस घालणार असल्यामुळे पाठीवर मेहंदी काढण्याची कल्पना सुचली. टॅटू काढण्याची इच्छा होती पण त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार केला. मेहंदी सुरक्षित आणि अत्यंत नैसर्गिक पर्याय असल्यामुळे मी व माझ्या मैत्रिणींनी मेहंदी ब्लाऊजला प्राधान्य दिले.
- साक्षी कोतुळकर, धायरी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60845 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..