
आत्मनिर्भतेसाठी स्वदेशी हाच मंत्र : गडकरी
पुणे, ता. ६ : ‘‘देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वदेशी वस्तू वापरण्याचा मंत्र प्रत्यक्ष आणला पाहिजे. एकविसावे शतक भारताचे असून आपण त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे,’’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री
नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘जीतो कनेक्ट : २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘‘देशातून निर्यात होणाऱ्या मालाचे प्रमाण वाढल्यानंतर उद्योगांना गती मिळेल आणि गुंतवणूकही वाढेल. यातून तरुणांना रोजगार मिळेल. पर्यायाने देशातील गरीबी दूर होईल. त्यामुळे देश भीती, भूक आणि भ्रष्टाचार मुक्त होण्यास मदत मिळेल. त्यातून सुखी, समृद्ध आणि संपन्न भारत एकविसाव्या शतकातील ‘सुपर इकॉनॉमी पॉवर’चे आपले स्वप्न पूर्ण होईल.’’
भारताची संस्कृती ही भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि भगवद्गीता तत्वज्ञानावर आधारित असून ती जागतिक कल्याणाची संस्कृती आहे. जगातील आजची स्थिती तणावपूर्ण आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. विश्व कल्याणाचा विचार भारतीय संस्कृतीमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘जीतो अॅपेक्स’चे चेअरमन गणपतराज चौधरी म्हणाले, “कोरोनात उद्योगांना फटका बसला. पण, ‘जीतो’चे सदस्य या दरम्यान दुपटीने वाढले असून ९०० कोटी रुपयांपर्यंत आर्थिक क्षमता वृद्धी झाली आहे.’’ ‘जीतो अॅपेक्स’चे व्हाईस चेअरमन विजय भंडारी म्हणाले, ‘‘कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि नवीन संधीविषयी जागरूक निर्माण करण्यासाठी ‘जीतो कनेक्ट’ परिषदेचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे.’’
कठीण काळात एकत्र येऊन काय होऊ शकते याचे उदाहरण ‘जीतो पुणे चॅप्टर’ने दाखवून दिल्याचे ‘जीतो पुणे’चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी सांगितले. कोरोनाचा फटका सर्वांना बसला आहे. अशा वातावरणात हा कार्यक्रम ‘जीतो पुणे’ने करून दाखविला आहे. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ‘जीतो कनेक्ट’चे समन्वयक राजेश सांकला यांनी व्यक्त केले. उद्योजक प्रकाश धारिवाल, नरेंद्र बलदोटा यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
जगात दहशतवाद पसरतो आहे. एकमेकांना संपविण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे जैन धर्माच्या पंचशील तत्त्वांचे अनुकरण करण्याची गरज आहे. याची सुरवात स्वतःपासून केली पाहिजे.
-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60857 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..