
‘शाहू महाराजांनी उभारला सामाजिक स्वातंत्र्याचा लढा’
पुणे, ता. ६ : ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकीकडे राजकीय पाळीवर लढा सुरू होता, तर दुसरीकडे जातीभेद, अस्पृश्यता, शिक्षणाचा अभाव यांसारख्या सामाजिक कुप्रथांविरोधात सामाजिक स्वातंत्र्याचा लढा सुरू होता. राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक रुढीपरंपरेतून बाहेर पडण्याची गरज राजर्षी शाहू महाराज यांनी ओळखल्याने त्यांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला,’’ असे मत ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात बलकवडे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यापीठातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य राजेश पांडे, संदीप खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले,‘‘राजर्षी शाहू महाराज हे लोकनेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी मदत केली. आरक्षण हे शाहू महाराजांच्या काळातच सुरू झाले. आज शंभर वर्षांनंतरही त्यांचे विचार हे आधुनिक आहेत.’’
डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘कोणत्याही महापुरुषाला जातीच्या कुंपणात न बांधता त्यांच्या कार्याचा सापेक्ष अभ्यास होणे गरजेचे आहे. शाहू महाराजांनी सर्वांच्याच शिक्षणासाठी प्रयत्न केले.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60873 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..