
स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे ‘जीतो कनेक्ट’मधील फॅमिली ऑफिस समिटमध्ये तज्ज्ञांचा सल्ला
पुणे, ता. ६ : उद्योजक कुटुंबीयांच्या वित्ताचे व्यवस्थापन करणाऱ्या फॅमिली ऑफिसेसने आता स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीलाही प्राधान्य द्यायला हवे, असा सूरज ‘जीतो कनेक्ट : २०२२’मध्ये उमटला.
मार्केटयार्ड येथे आयोजित केलेल्या फॅमिली ऑफिस समिटमध्ये मेफेझेलिया फॅमिली ऑफिसचे प्रमुख अमोल साठे, एलएनबी ग्रुपच्या फॅमिली ऑफिसचे संचालक अमित मेहता, आरएएवाय ग्लोबल इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक अमित पटनी सहभागी झाले होते. वॉटरफिल्ड ॲडव्हायझर्सचे कार्यकारी संचालक विवेक राजारामन यांनी चर्चाप्रवर्तक म्हणून जबाबदारी पार पडली. फॅमिली ऑफिसेस कंपन्यांची आदर्श कार्यप्रणाली, तसेच त्यांच्याकडे असलेल्या उद्योगांच्या वित्ताची गुंतवणूक आणि बड्या उद्योजक कुटुंबांनी आपले वारसदार निवडताना घ्यावयाची काळजी, अशा विविध विषयांवर या वेळी चर्चा झाली.
पटनी म्हणाले, ‘‘स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीसाठी प्रगल्भ दृष्टिकोन आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज आहे. आम्ही तर स्वतःचे निधी सुरू केले. रचनात्मक गुंतवणूक आणि योग्य स्टार्टअपची निवड केली तर निश्चित परतावा मिळेल. तसेच अशा स्टार्टअपमुळे सध्या काय चालले आहे. बाजारात नवीन काय आलेय, हे शिकायला मिळेल.’’
मेहता म्हणाले, ‘‘विविधांगी गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. प्रत्येक दशकात परिस्थिती बदलत असून, जमिनीवरील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक हवी.’’ फॅमिली ऑफिसेस ही वित्ताचे संरक्षण करण्यासाठी असतात. त्यांनी मर्यादा समजून घेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला साठे यांनी दिला. गुंतवणूक केलेल्या स्टार्टअपचे सातत्याने मूल्यमापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
फॅमिली ऑफिस म्हणजे काय?
खासगी संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार म्हणून कार्य करणारी संस्था म्हणजे फॅमिली ऑफिस होय. ज्या अति उच्च उत्पन्न गटातील उद्योजक कुटुंबांना सल्ला आणि सेवा देतात. श्रीमंत कुटुंबांचे आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणुकी संदर्भात हे ऑफिसेस काम करतात. उदाहरणार्थ : कंपनीचे बजेटिंग, विमा, धर्मादाय देणे, संपत्ती हस्तांतर आणि कर सेवा आदी.
६२४७६
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60876 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..