पोलिसांनी मागविलेल्या माहितीवर पालिकेची टोलवाटोलवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी मागविलेल्या माहितीवर पालिकेची टोलवाटोलवी
पोलिसांनी मागविलेल्या माहितीवर पालिकेची टोलवाटोलवी

पोलिसांनी मागविलेल्या माहितीवर पालिकेची टोलवाटोलवी

sakal_logo
By

कैलास स्मशानभूमी दुर्घटना
-------------------------


पुणे, ता. ६ ः कैलास स्मशानभूमी येथे अंत्यविधी करताना ११ नागरिक होरपळून त्यातील एकाचा मृत्यू झाला असताना या घटनेचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी महापालिकेकडे अंत्यविधी करताना ठेकेदारांसाठी काही नियमावली आहे का, असे विचारले असता महापालिकेच्या विद्युत विभागाने थेट अशी नियमावली करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले आहे, तसेच पोलिसांना हवी असलेली बहुतांश माहिती महापालिकेने दिलेली नसून, प्रश्‍नांची टोलवाटोलवी केल्याचे अहवालात दिसून आले आहे.

पुणे महापालिकेच्या कैलास स्मशानभूमी येथे शेडमध्ये ४५ वर्षीय व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असताना पेट्रोल टाकले जात होते. त्यावेळी त्याचा भडका उडून ११ जण भाजले. ही घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाने ‘या घटनेचा आमचा काही संबंध नाही?’ अशी भूमिका घेत त्याकडे दुर्लक्ष केले, तसेच स्मशानभूमीच्या कारभारात सुधारणा करण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमीचे कामकाज आरोग्य विभाग, विद्युत विभाग व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून पाहिले जाते, पण या तिन्ही विभागात समन्वय नसल्याने त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. ही घटना घडल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवून या घटनेसंदर्भात तसेच महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांची माहिती मागवली होती. त्याचे उत्तर विद्युत विभागाने आज (ता. ६) दिले आहे.

पोलिसांनी महापालिकेला अंत्यविधीच्या कामाच्या निविदेची माहिती मागवली होती, त्यावर विद्युत विभागाने अंत्यविधीसाठी निविदा काढलेली नाही, त्यामुळे याची प्रमाणित प्रत देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे उत्तर दिले आहे. अंत्यविधीबाबत ठेकेदारांसाठी नियमावली होती का? या प्रश्‍नावर, कोणतीही नियमावली करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही असे उत्तर विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिले आहे.

स्मशानभूमीत नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप काय याची माहिती द्यावी, त्यांचे नाव व संपर्क क्रमांक द्यावेत, अशी मागणी पोलिसांनी केली असता यासाठी विद्युत विभागाने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे बोट दाखविले असून, त्यांची नियुक्ती क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते, त्यांचे नाव व नंबरही त्यांच्याकडूनच घ्यावे, असे उत्तर दिले आहे. विद्युत विभागाने केवळ ठेकेदाराकडून नियुक्त केलेल्या पाच कर्मचाऱ्यांचे नाव व नंबर पोलिसांना दिले आहेत. चितेला अग्नी दिल्यानंतर लाकूड, गवऱ्या याचा धूर इतरत्र पसरू नये यासाठी धूर नियंत्रण मशिन चालू करणे व चिता शांत झाल्यानंतर बंद करणे हे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप आहे, असे उत्तर महापालिकेने दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60900 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top