आई होऊन चालवतेय आईचा वारसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आई होऊन चालवतेय आईचा वारसा
आई होऊन चालवतेय आईचा वारसा

आई होऊन चालवतेय आईचा वारसा

sakal_logo
By

जागतिक मातृदिन विशेष
पीतांबर लोहार


पिंपरी, ता. ७ : तिला डॉक्टर व्हायचं होतं. गरिबांसाठी मोठं रुग्णालय सुरू करायचं होतं. पण, तिची आई, अनाथ, अपंग, दृष्टिहीन, एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करत होती. हे सारं ती बालपणापासून पहात होती. आईकडून हेच बाळकडू घेऊन ती पदवीधर झाली आणि अनाथांची सेवा करू लागली. आता आईच्या पश्चात अनाथांची आई होऊन ती त्यांची सेवा करतेय. शिरगाव व देहूरोडच्या माई बाल भवनच्या संचालिका रुचिरा इंगळे यांची ही कहाणी.
वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या प्रतिज्ञा देशपांडे-इंगळे यांनी देहूरोड शितळानगर येथील सेंट थॉमस कॉलनीत २००६ मध्ये माई बालभवन नावाची संस्था सुरू केली. त्या माध्यमातून अंध, अपंग, एचआयव्ही बाधित अनाथ मुला-मुलींचे संगोपन सुरू केले. अशा व्यक्तींना कोणी रोजगार देत नाही. व्यवसायासाठी त्यांना बॅंकांकडून कर्ज मिळू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र जगावे या उद्देशाने माई बालभवनची स्थापना प्रतिज्ञा यांनी केली. माईंना कृषी शाखेतील द्विपदवीधर पती मधुकर इंगळे यांची साथ मिळाली. माईंनी ठरवले होते की, आपले पहिले अपत्य मुलगा असो की मुलगी ते एकमेवच असेल. १९९८ मध्ये त्यांच्या घरात कन्या जन्माला आली. तीच रुचिरा. गेल्या वर्षी कोरोनातून बरे झाल्यानंतर माईंचे १२ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराने निधन झाले आणि रुचिराने अनाथांच्या सेवेत वाहून घेतले.

शिरगावात मुलींची व्यवस्था
देहूरोडची जागा कमी पडत असल्याने इंगळे पिता-पुत्रीने मावळ तालुक्यातील शिरगावला मुलींची व्यवस्था केली. तेथील माई बालभवनमध्ये ३२ मुलींचा सांभाळ रुचिरा करत आहे. त्यात तीन मुली एचआयव्ही बाधित आहेत. त्यांचे शिक्षण सुरू आहे. दोन दहावीत व एक दुसरीत आहे. यापूर्वी एचआयव्ही बाधित दोन मुलींचे विवाह करून दिले आहेत. देहूरोड येथील बालभवनात १२ मुले आहेत.

दिनचर्या
माई बालभवनातील मुलांची दिनचर्या पहाटे चार वाजल्यापासूनच सुरू होते. दोन तास योगासने व सूर्यनमस्कार घातले जातात. मुली फुटबॉल खेळतात. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यास रेकॉर्ड करून ऑडिओ स्वरुपात शिकवला जातो. परीक्षेच्या वेळेस मुलांना लेखनिक दिले जातात. अनेक मुलांना सरकारी बँका, खासगी कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत ३६ मुलींचे विवाह संस्थेने केले आहेत.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
मुलांना पाकशास्त्र व गृहशास्राचे धडे दिले जातात. पुरणपोळी, वडे, भाजी, मोदक, पुरी, चायनीज, विविध चटण्या असे पदार्थ दृष्टिहीन मुले सहजपणे करतात. कपड्यांना इस्री करणे, संगणक हाताळणे, विणकाम, भरतकाम, बुद्धीबळ, फुटबॉल, गायन, वादन, पांढरी काठी घेऊन कसे चालायचे, रस्ता ओलांडायचा याचे प्रशिक्षणही दिले जाते.

माईचे (आई) कार्य आणखी विस्तारायचे आहे. सुरुवातीला मुले हट्टी वाटायची. पण, प्रेमाने सांगितल्यावर ते ऐकतात. राष्ट्रीय अंध फुटबॉल संघात दोन मुलींची निवड झाली होती. आठ जणी फुटबॉल खेळाडू आहेत. बुद्धीबळातही त्या चॅम्पियन आहेत. अशा मुलांसाठी शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा विचार आहे.
- रुचिरा इंगळे, संचालक, माई बाल भवन, शिरगाव व देहूरोड

मी चार वर्षांपूर्वी माई बालभवनमध्ये आले. अंध मुलींच्या फुलबॉल राज्य संघाकडून राष्ट्रीय स्पर्धेत खेळले. त्यात आमचा संघ विजेता ठरला होता. बीएच्या द्वितीय वर्षाला शिकते आहे. माईंनी मुलीसारखे प्रेम केले.
- सारिका बरूड, विद्यार्थिनी, माई बाल भवन, शिरगाव

मी मुळची सोलापूर जिल्ह्यातील आहे. २०१९ मध्ये माई बालभवनमध्ये आले. येथील वातावरण घरच्यासारखे आहे. मी बीएच्या प्रथम वर्षाला आहे. यापूर्वी केवळ फुटबॉल विषयी ऐकले होते. इथे आल्यावर प्रत्यक्ष खेळायला मिळाले. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळले.
- भाग्यश्री रुगी, विद्यार्थिनी, माई बालभवन, शिरगाव

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60926 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top