
शाळेच्या सुरुवातीलाच मिळणार गणवेश
पुणे, ता. ६ : नियमितपणे शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थी मात्र गणवेशाविनाच असल्याचे दरवर्षी दिसणारे चित्र नवे नाही. परंतु, राज्यातील शाळांमधील हे चित्र यंदा बदलण्याची चिन्हे आहेत. सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी सरकारने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यांसाठी तब्बल २१५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी वितरित केल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या सुरवातीलाच गणवेश मिळावेत याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी शाळा सुरू होताच दोन गणवेश मिळावेत, असे आदेश संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती गायकवाड यांनी ट्विटर आणि फेसबुकद्वारे दिली आहे. गायकवाड म्हणाल्या,‘‘हा निधी तालुकास्तरावरून संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यात त्वरित पाठविला जावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा दर्जा चांगला असावा, अशा सूचनाही शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.’’
पायाभूत सुविधांसाठी शाळांना ८९.५९ कोटी
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील मुली आणि मागासवर्गीय मुलांना दरवर्षी दोन गणवेश मोफत दिले जातात. ३५ लाख ९२ हजार ९२१ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. याशिवाय ६५ हजार ६२० शासकीय शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदानापोटी ८९.५९ कोटी रुपये देखील जिल्हा प्रशासनाला वर्ग केले असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60934 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..