
‘शिवरायांच्या संकल्पनेतील राज्य शाहू महाराजांनी सत्यात उतरवले’
पुणे, ता. ६ : ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवत, शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी प्रकल्प राबविले. छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य शाहू महाराजांनी सत्यात उतरवले,’’ असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केले.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी (एआयएसएसएमएस) येथे मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड आणि राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देशमुख बोलत होते.
राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील समर्थ राजेंद्र पाटील या विद्यार्थ्यास शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली.
इतिहास संशोधिका डॉ. सुवर्णा नाईक- निंबाळकर, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे विठ्ठल गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, ॲड. विकास शिंदे, सह्याद्री प्रतिष्ठानचे रवींद्र मोहोळ आदी या वेळी उपस्थित होते.
शाहू महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी विविध शंभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे
विकास पासलकर यांनी या वेळी सांगितले.
सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट, युवराज ढवळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60955 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..