
पस्तीस अनाथांना सांभाळणारी माय
पुणे - ‘त्या’ तब्बल ३५ मुला-मुलींची आई (Mother) आहेत. अनाथ, (Orphans) एचआयव्ही, एड्सबाधित मुलांचा सांभाळ त्या आनंदाने करतात. त्यातील तीन मुलांचे विवाह (Marriage) झाले असून, सध्या त्या आजीची भूमिकाही निभावत आहेत. मुलांचे संगोपन करताना त्यांच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देणाऱ्या ‘ममता फाउंडेशन’च्या (Mamta Foundation) संस्थापिका शिल्पा बुडूख-भोसले (Shilpa Budukh Bhosale) यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे.
रस्त्यावर राहणारी मुले, देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एमएसडब्ल्यूची पदवी प्राप्त केलेल्या शिल्पा बुडूख व त्यांचे पती अमर बुडूख काम करायचे. हे काम करताना ज्यांना आई-वडील नाहीत, नातेवाइकांनी सांभाळ करण्यास नकार दिला आहे, अशा अनाथ व एचआयव्ही झालेल्या मुलांचा सांभाळ कोण करणार? हा प्रश्न दोघांना पडला आणि याच प्रश्नातून ‘ममता फाउंडेशन’चा जन्म झाला. २००८ मध्ये या संस्थेची स्थापना गुजर निंबाळकरवाडी येथे करण्यात आली.
शिल्पा बुडूख सांगतात, ‘‘अनाथाश्रमे खूप आहेत, पण एचआयव्ही बाधित मुलांसाठी काहीच नव्हते. या आजाराबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. अशा मुलांना खरी मायेची गरज आहे, हे ओळखूनच संस्था सुरु केली. माझ्या दोन मुलींप्रमाणेच ही ३५ मुलेही माझीच आहेत. आपण समाजापासून दूर आहोत, आपल्याला कुटुंब नाही, ही भावना त्यांच्या मनात कधीच येत नाही. कारण ‘ममता’ ही संस्था नाही, तर एक घर, कुटुंब आहे. त्यादृष्टीने सगळे सण समारंभ, वाढदिवसापासून सगळे कार्यक्रम आम्ही एकत्र करतो. मुलांना गडकिल्ले, समुद्र किनारे, पर्यटनस्थळांवर फिरायला नेतो. ते त्यांचे आयुष्य आनंदात जगताहेत.’’
संस्थेमध्ये चार वर्षापासून ते २० वर्षांपर्यंतची मुले आहेत. या मुलांना पौष्टिक आहार, नियमीत वैद्यकीय उपचार, विविध तपासण्या, खेळ, व्यायामापासून ते त्यांच्या शाळा-महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते.
मुलांचा सांभाळ करत असताना ही मुले कधी मोठी झाली हे लक्षातही आले नसल्याची भावना शिल्पा यांनी व्यक्त केली. यातील काही मुले ही नोकरीही करीत आहेत. आजी झाल्यानंतर मुलीचे आणि बाळाचे सर्वांनी कौतुकही केले. तिच्यासाठी बाळंतपणात लागणाऱ्या सर्व गोष्टी करण्याची मजा काही वेगळीच भावना देऊन गेली असेही त्या म्हणाल्या. समाजाकडून मिळणाऱ्या देणगीवर त्यांची मुले-मुली मोठी होत आहेत, शिक्षण घेत आहेत.
आपण किती जगणार आहोत, हे आपल्यालाही माहीत नसते. या मुलांच्या आयुष्याबाबतचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. या मुलांना आम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर बनविले आहे. समाजाच्या बळावर या मुलांना सांभाळण्याची ताकद आम्हाला मिळत राहो.
- शिल्पा बुडूख-भोसले, संस्थापक अध्यक्ष, ममता फाउंडेशन
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60956 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..