
‘सनातन’विरोधात तक्रार दिली नाही
पुणे, ता. ६ : बुवाबाजी करणाऱ्यांवर छापे टाकले, तसेच त्याविरोधात पोलिस तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करताना केल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा सनातन संस्थेवर संशय आहे. सनातन संस्थेविरोधात आपण कधीही तक्रार केली नाही, अशी माहिती उलटतपासणीदरम्यान अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी न्यायालयाला दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या कार्यालयात २००१ पासून व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे प्रशांत पोतदार यांची साक्ष व उलट तपासणी शुक्रवारी (ता. ६) विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सनातन संस्थेबाबत अंनिसकडून आतापर्यंत एकही दावा केला नाही. मात्र, सनातन संस्थेने आमच्याविरुद्ध अनेक दावे केले आहे. मांढरदेवीच्या यात्रेत एका मांत्रिकाचा भांडाफोड अंनिसने केला होता. त्यानंतर, त्या मांत्रिकाने पोलिसांसमक्ष माफीनामा दिल्याने त्याविरोधात फिर्याद दिली नाही. त्यावर, बचाव पक्षातर्फे प्रकाश साळशिंगीकर यांनी अंनिसला माफी देण्याबाबतचे अधिकार अथवा त्याबाबतचे कागदपत्र आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. संस्थेतील व्यवहार, विविध देवस्थानांच्या विरोधात केलेल्या तक्रारी, पोतदार यांचे मानधन तसेच अंनिसने पोतदार यांच्या नावाने खरेदी केलेली गाडी व तिची विक्री, अंनिसच्या मासिकात त्या-त्या वेळी छापून आलेल्या लेखांबाबत पोतदार यांची उलटतपासणी घेण्यात आली. याप्रकरणातील पुढील साक्ष चार जून रोजी नोंदविण्यात येणार आहे.
अंनिस स्वतःला मोठी समजते का?
मांत्रिक स्वत:ला देवापेक्षा मोठे समजतात का? असा प्रश्न प्रकाश साळशिंगीकर यांनी उपस्थित केला. त्यावर, पोतदार यांनी कोणताही मांत्रिक, गंडे दोरे करणारा हा स्वत:ला देव समजत नाही. मात्र, ते अंगात देव आल्याचे समजतात. या उत्तराचा आधार घेत साळशिंगीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वत:ला न्यायव्यवस्था समजते का? न्यायव्यवस्थेपेक्षा मोठी असल्याचे समजते अशी विचारणा केली. त्यावर, यांनी हे विधान चूक असून, ते आपल्याला मान्य नाही. अंनिस स्वत:ला न्यायव्यवस्था अथवा न्यायव्यवस्थेपेक्षा मोठी समजत नसल्याचे पोतदार यांनी न्यायालयाला सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60959 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..