
ज्येष्ठ व तरुणांत सुसंवाद साधणारे ‘संज्या - छाया’
नात्यातील गुंतागुंत व गोडवा, यांतील फरक समजावून सांगणारे संज्या-छाया हवेहवेसे वाटतात. ज्येष्ठांप्रमाणेच ते नव्या पिढीलाही आत्मचिंतनाकडे वळवतात. खासगीपेक्षा सामाजिकतेवर यांचा भर. या अंतरंगी जोडप्याच्या विविधरंगी जीवनपद्धतीची ओळख ‘संज्या - छाया’ या कालसुसंगत नाटकातून अवश्य करून घ्यायला हवी.
जीगिषा- अष्टविनायक निर्मित या नाटकाचं लेखन प्रशांत दळवी व दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. ज्येष्ठत्वातील वडीलधारेपणाचा जाचक भार दुसऱ्यांना होऊ न देण्याची कला संज्या-छाया या नायक- नायिकेकडून शिकण्यासारखी आहे. सहजीवनात जपलेले परस्परांचं स्वातंत्र्य, हा त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र आहे. एकच जागा घर व कार्यालय या दोन्ही स्वरूपात किती भिन्न व मौजेची वाटू शकते, ते बघणंही एक वस्तुपाठ आहे. नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्या तपशीलवार आणि सुटसुटीत मांडणीमुळे आशयाला आधार मिळतो.
दासू (गीत), अशोक पत्की (गीत, संगीत) व पुरुषोत्तम बेर्डे (पार्श्वसंगीत) यांच्या कामगिरीने कथानकात चैतन्य आणले आहे. संज्या (वैभव मांगले) व छाया (निर्मिती सावंत) यांनी आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना वेदना - संवेदनांची अभिव्यक्ती हुकमीपणे केली आहे. सुनील अभ्यंकर, योगिनी चौक- बोऱ्हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव व राजस सुळे तसंच रुपेरी पडद्यावरून साथ देणाऱ्या सारंग साठे, पॉला, अभिनय सावंत व पूर्वा सावंत हे कलाकारही विविध भावछटांचा कॅलिडोस्कोप कौशल्याने हलता ठेवतात. समुपदेशनाच्या धर्तीची ही रंजक कथा युक्तीच्या चार गोष्टी सहजपणे सांगून जाते.
62593
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61044 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..