
‘पार्टीशन’मुळे दुरावलेली मने एकत्र!
पुणे, ता. ७ : लग्नानंतर त्यांचा नातेवाइकांबरोबर एकाच खोलीत संसार सुरू झाला. नातेवाइकांबरोबर राहत असताना खासगी आयुष्यच जगता येत नसल्याने पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. वाद अगदी टोकाला पोचल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र कालांतराने पतीला पत्नीच्या अडचणीची जाणीव झाली. त्यामुळे त्याने तिच्यासाठी घरात पार्टिशन (विभाजन भिंती) टाकून स्वतंत्र खोली तयार केली. अन् घटस्फोटापर्यंत आलेले दांपत्य पुन्हा संसाराला लागले.
लता व मनीष (नावे बदललेली आहेत) असे या जोडप्याचे नाव. त्यांचा २०१८ साली प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर ते कुटुंबीयांसह एकाच खोलीत राहत होते. एकत्रित कुटुंब, घरात जास्त माणसे आणि घर छोटे असल्याने त्यांना खासगी आयुष्यच जगता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यानंतर लता या पुणे येथे माहेरी आल्या. यादरम्यान दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यामुळे लता यांनी अॅड. शीतल शिंदे यांच्यामार्फत २०१९ साली कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. वेगळे राहिल्याच्या साडेतीन वर्षानंतर घटस्फोटाचे प्रकरण शेवटच्या टप्प्यात प्रकरणात असताना अटी-शर्ती तसेच देवाणघेवाण मान्य करत घटस्फोट घेण्याचे निश्चित झाले. यादरम्यान अॅड. शिंदे व त्यांना मदत करणाऱ्या अॅड. स्मिता पाटोळे तसेच समुपदेशकांनी मनीष यांना पत्नीच्या अडचणी सांगितल्या. खासगी आयुष्यच जगता येत नसल्याने लता यांची होणारी घुसमट त्यांनी मनीष यांना सांगितली. त्यामुळे पतीने पत्नीची होणारी अडचण लक्षात घेत खोलीमध्ये पार्टिशन टाकून स्वतंत्र खोली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लता यांना पतीने घेतलेला निर्णय आवडला तसेच मुलीच्या भविष्याखातर दोघांनी पुन्हा एकत्र येत सुखी संसारास सुरवात केली. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात हा दावा निकाली निघाला.
प्रत्येक व्यक्तीचे खासगी आयुष्य असते. परिस्थितीमुळे काही गोष्टी शक्य होत नाहीत. मात्र, त्यामधून मार्ग काढता येतात. हा दावा त्याच प्रकारचा होता. अगदी घटस्फोटाच्या टप्प्यापर्यंत आलेले प्रकरण तडजोडीअंती पुन्हा एकत्र आले ही आनंदाची बाब आहे.
- अॅड. शीतल शिंदे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61247 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..