
गुंतवणुकीत वैविध्य असणे आवश्यक गुंतवणुकीवरील चर्चासत्रात तज्ज्ञांचा सल्ला
पुणे, ता. ७ : गुंतवणूक करताना त्यात वैविध्य ठेवणे गरजेचे आहे. एकाच प्रकारात गुंतवणूक करणे जोखमीचे असते, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांनी ‘जीतो कनेक्ट’मध्ये आयोजित गुंतवणूकविषयक चर्चासत्रात दिला.
गुंतवणूक कुठे करायची रिअल इस्टेट, स्टार्टअप की इतर मालमत्ता? या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल ओसवाल, रेअर एंटरप्राईजेसचे (राकेश झुनझुनवाला) उत्पल शेठ, व्ही कॅट्सचे
सहसंस्थापक डॉ.अपूर्व रंजन शर्मा, एव्हरस्टोन कॅपिटलचे उपाध्यक्ष धनपाल झवेरी सहभागी झाले होते. या चर्चासत्राला तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती.
शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करताना मोतीलाल ओसवाल म्हणाले, ‘‘एकाच शेअरमध्ये मोठी गुंतवणूक न करता अनेक शेअरमध्ये विभागून गुंतवणे योग्य ठरते. तसेच शेअरशिवाय मुच्युअल फंड सारख्या वेगवेगळ्या पर्यायामध्ये गुंतवणूक करणेही आवश्यक आहे. सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत, हे लक्षात ठेवा. शेअरमध्ये दीर्घ मुदतीसाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे दुप्पट पैशाची निर्मिती होईल. सट्टा खेळल्यासारखी जोखीम घेत गुंतवणूक करू नका. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पद्धतीने गुंतवणूक करा. त्याचप्रमाणे तुम्हाला समजते तेव्हाच गुंतवणूक करा अन्यथा करू नका. एखाद्या पर्यायाबाबत माहिती नसल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.”
क्रिप्टो करन्सी हे डिजिटल चलन आहे. त्याच्या दीर्घकालीन वर्तनाचा अंदाज लावला जाऊ शकत नाही, मात्र त्याचे निरीक्षण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. अपूर्व रंजन शर्मा यांनी स्टार्टअपमधील गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याने त्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ‘‘गुंतवणूक करताना नेहमी आशावादी असावे. किती पैसा गुंतवणुकीसाठी आहे त्याची खात्री करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परतावा मिळवण्यासाठी थोडा धीर धरावा. नेहमी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा,’’ असा सल्ला उत्पल शेठ यांनी दिला. धनपाल झवेरी यांनीही वैविध्यपूर्ण आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवरील मार्गदर्शनावर भर दिला.
देशाची अर्थव्यवस्था वेगाने एक ट्रिलियन डॉलरकडे झेपावत आहे. जागतिक गुंतवणूकदार भारतीय स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करत आहेत. स्टार्टअप हा उच्च परतावा आणि उच्च जोखमीचा मालमत्ता वर्ग आहे, परंतु गुंतवणूकदारांनी आत्मविश्वासाने त्यांची भविष्यातील गुंतवणूक सुरक्षित करणे आवश्यक आहे.
-डॉ.अपूर्व रंजन शर्मा, सहसंस्थापक, व्ही कॅट्स
PPRTT22B07819
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61259 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..