
गुन्हा कबूल केल्याने सहा आरोपींची मुक्तता
पुणे, ता. ९ : चोरीला गेलेली वस्तू परत मिळाल्यानंतर आणि पुन्हा असा गुन्हा करणार नाही याचे हमीपत्र आरोपीकडून घेऊन, त्याला मुक्त करण्यास फिर्यादी यांची कोणतीही हरकत नसलेल्या सहा आरोपींची शनिवारी मुक्तता केली.
येरवडा कारागृहात लोकअदालत आयोजित करून आरोपींना गुन्हा कबूल करण्याची संधी दिली. गुन्हा कबूल करीत असा गुन्हा पुन्हा न करण्याच्या हमीवर आरोपींची मुक्तता करण्याचा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच राबविला होता. त्यासाठी फिर्यादींना नोटीस पाठवून कारागृहामध्ये लोकअदालतीत बोलावले होते. त्याला १७ पैकी सहा फिर्यादींनी प्रतिसाद दिल्यामुळे न्यायाधीशांनी ती प्रकरणे निकाली काढत सहा आरोपींची मुक्तता केली. भारतीय दंडविधान संहिता कलम ३७९ (चोरी) व ३८० (राहत्या घरात चोरी) च्या गुन्ह्यातील २२ प्रकरणे लोकअदालतीत ठेवले होते. त्यातील पाच आरोपींची आधीच सुटका झाल्याने १७ प्रकरणांवर सुनावणी झाली. गुन्हा दाखल केलेल्या सहा फिर्यादींनी नोटीसला प्रतिसाद दिला. त्यामुळे सहा कैदी कारागृहामधून सोडल्याची माहिती येरवडा कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी दिली. त्याकरिता एकाच न्यायाधीशाचे स्वतंत्र पॅनेल स्थापन केले होते. लोकअदालतीमध्ये आरोपीचे प्रकरण फिर्यादींसमक्ष मिटल्यामुळे आरोपींना कारागृहामधून सोडल्याचे भोसले यांनी सांगितले.
...अशी झाली प्रक्रीया
- फिर्यादी यांना लोकअदालतीत बोलावून त्यांना त्यांच्या वस्तू मिळाली की नाही हे विचारले
- वस्तू मिळाली असल्यास आरोपीला बाहेर सोडले, तर चालेल का? अशी विचारणा केली
- फिर्यादी यांनी होकार दिल्यानंतर आरोपीकडून कायदेशीर बाबींची पूर्तता झाली
- पुन्हा चोरीचा गुन्हा न करण्याचे हमीपत्र त्याच्याकडून लिहून घेतले
- आरोपीला सोडण्यास काही हरकत नसल्याचे पत्र फिर्यादीकडून घेतले
- सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आरोपींना सोडले
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61553 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..