पुणे सलग पाचव्यांदा नंबर वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे सलग पाचव्यांदा नंबर वन
पुणे सलग पाचव्यांदा नंबर वन

पुणे सलग पाचव्यांदा नंबर वन

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : दाखलपूर्व दावे आणि न्यायालयात प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली निघावेत, यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने यावेळीही सर्वाधिक दावे निकाली काढले. दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा सलग पाचव्यांदा पहिल्या स्थानी राहिला आहे.

शनिवारी (ता. ७) आयोजित लोकअदालतीत एकूण ३२ हजार ३९६ दावे निकाली काढले. त्यामध्ये २१ हजार ३१८ दाखलपूर्व आणि ११ हजार ०७८ प्रलंबित दाव्यांचा समावेश आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख आणि सचिव प्रताप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन केले होते. जिल्हा न्यायालयात सध्या एक लाख ९४ हजार ७३० दावे प्रलंबित आहेत. त्यापैकी ११ हजार ०७८ प्रलंबित दावे आणि ९२ हजार ८६८ दाखलपूर्व दावे, असे एकूण एक लाखाहून अधिक दावे लोकअदालतीत तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवले होते. त्यासाठी न्यायाधीश व ज्येष्ठ वकिलांचा समावेश असलेल्या १२४ पॅनेलची नियुक्ती केली होती. त्या माध्यमातून एकूण ३२ हजार ३९६ दावे निकाली काढून, १११ कोटी २७ लाख ८९ हजार ७५७ रुपयांची भरपाई वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले.

निकाल काढलेली प्रकरणे :
फौजदारी व दिवाणी, धनादेश बाउन्स, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार वाद, भूसंपादन, नोकरी आणि महसूल विषयक प्रकरणे, विविध बँका, वित्तीय संस्था, दूरध्वनी व विद्युत विभाग, पुणे व पिंपरी महापालिका आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे प्रलंबित पाणीपट्टी, मिळकतकर आदी दाखल व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढली. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार, वाहतूक नियमभंग प्रकरणात नागरिकांना ठोठावलेल्या दंडात्मक ई-चलनाचे लाखो दावेही या वेळी निकाली निघाले.

‘लॉकडाउन’चे किरकोळ दावे :
किरकोळ स्वरूपाचे दावे निकाली काढण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दोन ते सहा मेदरम्यान जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण ११ हजार ३८६ दावे निकाली काढले. त्यामध्ये ‘लॉकडाउन’च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दोन हजारांहून अधिक किरकोळ दावे निकाली काढले. याशिवाय सीआरपीसी कायद्याच्या कलम २५६ नुसार फिर्यादीचा मृत्यू झालेली प्रकरणेही निकाली काढली.

३४ जोडप्यांचा संसार पुन्हा जुळला :
कौटुंबिक वाद सुरू असलेल्या ३४ जोडप्यांनी लोकअदालतीत पुन्हा सुखाने नांदण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत झाली. त्यामध्ये कौटुंबिक स्वरूपाचे ३९ दावे निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले. त्यापैकी तीन दावे ऑनलाइन, तर ३६ दावे पक्षकारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत निकाली काढले. या दाव्यांमधील ३४ जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

‘‘मागील सलग पाच लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. या पाचही लोकअदालतीत आणि विशेष मोहिमांमध्ये एक लाखांहून अधिक प्रलंबित दावे निकाली काढण्याचा विक्रम झाला आहे.’’
- न्या. प्रताप सावंत, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

लोकअदालत दिनांक - निकाली दावे
१-८-२०२१- ३३,०६१
२५-९-२०२१ - ८४,६५०
११-१२-२०२२ - ४९,२४६
२०- ३- २०२२- ४६,६५९
७-५-२०२२ - ३२,३९६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61557 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top