
दोन लाख जागा रिक्त भरणार ः भरणे
पुणे, ता. ९ : ‘‘कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या सहा महिन्यांत पदभरतीच्या सात हजार जागांसाठी जाहिराती दिल्या आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनात विविध विभागांतर्गत तब्बल दोन लाख जागा रिक्त असून ती पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे तरुणांनी आपले ध्येय निश्चित करावे. मनात जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती ठेवून त्यादिशेने वाटचाल करावी, त्यातून निश्चितच यशाचा मार्ग मिळेल’’, असा सल्ला राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी युवकांना दिला.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) वतीने ‘चला घडू देशासाठी’ या दोन दिवसीय समर यूथ समिटचे उद्घाटन भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी झाले. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस, ‘स्मार्ट सिटी पुणे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे (पीसीसीओई) संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, युनिक ॲकॅडमीचे मुख्य व्यवस्थापक नागेश गव्हाणे उपस्थित होते.
भरणे म्हणाले, ‘‘कोरोनानंतर राज्यात १५ हजार जागांवरील पदभरती सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार आतापर्यंत सात हजार जागांवरील भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.’’
कोलते म्हणाले, ‘‘तरुणांनी आपल्यातील गुण ओळखून, आवड आणि निष्णात असणाऱ्या क्षेत्रात करिअर करावे. त्या दिशेने जाण्याचा मार्ग निवडावा आणि पुढे जावे.’’ गव्हाणे म्हणाले, ‘‘आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असावे. त्यादृष्टीने बौद्धिक संपदा आत्मसात करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल.’’
यावेळी ‘यिन’च्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. प्रतिक्षा इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थिनींनी नृत्यातून गणेशवंदना सादर केली. या कार्यक्रमात फडणीस यांनी प्रास्ताविक केले तर भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
आत्मविश्वास कमी-अधिक असू शकतो. परंतु करिअर करताना अनेकजण गोंधळलेल्या अवस्थेत असतात. मनातील गोंधळ वेळीच दूर करणे गरजेचे आहे. संधी ओळखायला शिका. छंद, संधी आणि व्यवसाय हे एकत्र आले तर तो दुग्धशर्करा योग ठरेल.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त
व्यवसाय सुरू करण्यासाठी आतासारखी संधी नाही. त्यामुळे तरूणांनी नोकरीच्या शोधात धावण्यापेक्षा व्यवसायाचा मार्ग निवडावा. व्यवसायात आत्मीयता आणि व्यवसाय करण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे.
- डॉ. गोविंद कुलकर्णी,
संचालक, पीसीसीओई
मान्यवरांचा तरुणांना सल्ला
१) प्रत्येक ठिकाणी स्पर्धा असून त्यासाठी तयारी हवी
२) संधी ओळखा आणि आयुष्यात मिळेल त्या संधीचे सोने करा
३) नोकरी शोधण्याऐवजी व्यवसायाकडे वळावे
४) मानसिक स्थिरता मिळणे महत्त्वाचे
५) न्यूनगंड बाळगू नका
६) जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती ठेवा
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61563 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..