
प्रकल्पांना घाई नको; नागरिकांशी चर्चा करा!
पुणे, ता. ९ ः नळस्टॉप येथील उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला असताना याच भागात नव्याने होणारे उड्डाणपूल व इतर मार्गांना नागरिकांचा विरोध होत आहे. त्यावर भाजपने ''शहरात कोणताही मोठा प्रकल्प केला जात असताना घाई न करता नागरिकांशी चर्चा करावी व त्यानंतरच प्रकल्प करावे सुरू करावेत’ अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणीही केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘२३ गावांमधील नवीन बांधकामांना पाणी पुरवठा करण्यासाठी बिल्डरने प्रतिज्ञापत्र दिले आहे. महापालिकेची समान पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत बिल्डरने आर्थिकभार उचलावा. या भागात सध्या अस्तित्वातील पाणी पुरवठ्याच्या वाहिनींद्वारे रोज पाणी द्यावे, अशी चर्चा झाली.
नळस्टॉपचा उड्डाणपूल झाला नसता तर भीषण स्थिती निर्माण झाली असती, पूल पाडणे हे त्याचे उत्तर नाही. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बैठका घेतल्या. आता कोंडी कमी झाली आहे, पण अजून प्रश्न संपलेला नसल्याने मार्ग काढला जात आहे. कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल, वेताळ टेकडीवरील भुयारी मार्ग व रस्त्यावर नागरिकांचे जे काही आक्षेप असतील त्यावर नागरिकांशी चर्चा करून शंकांचे निरसन करावे. बावधन येथील कचरा हस्तांतराचा प्रकल्प होऊ नये असे, प्रशासनाला सांगितले आहे. तसा भाजप सत्तेत असताना ठरावदेखील केला होता.
------------------
नाट्यकर्मींशी चर्चा केली जाईल
बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नवे नाट्यगृह बांधेपर्यंत नाट्यकर्मींचे नुकसान होणार आहे, पण नवी इमारत बांधल्यानंतर जास्त जागा वापरात येईल, नवे नाट्यगृह उपलब्ध होईल. जास्त नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्यामुळे त्यांचाच फायदा होऊ शकतो. यासंदर्भात त्यांच्याशीही चर्चा केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61571 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..