
अवती भवती
‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’चे आयोजन
पुणे, ता. ९ : ‘आटेक्यूब गॅलेरिया पुणे’च्यावतीने ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात राज्यासह देश, विदेशातील चित्रकार व शिल्पकार सहभागी होणार असल्याची माहिती ‘एक्स्पो’चे आयोजक अतुल काटकर व प्रमोद माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन येत्या १२ ते १५ मे दरम्यान होणार आहे. एरंडवणे लॉन्स येथे १२ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे उद्धाटन होणार आहे. यामध्ये देश विदेशातून चारशेहून अधिक चित्रकार व शिल्पकार सहभागी होणार आहेत. या वेळी काही लाइव्ह पेंटींग डेमो, तसेच पेंटींग स्पर्धा देखील होणार असून यातील विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. पुणे, मुंबईसह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, दिल्ली या राज्यांतून, तसेच दुबई, अमेरिका, मस्कत आदी देशातील चित्रकार, शिल्पकार या प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचे काटकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे ‘कॉफी विथ मिनिस्टर’
पुणे, ता. ९ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे ‘कॉफी विथ मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. येत्या १३ मे रोजी सकाळी ११ वाजता सिद्धी बँकवेट, म्हात्रे पूल येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सनी मानकर यांनी दिली. या वेळी संध्या सोनवणे, नीलेश शिंदे, गिरीश गुरनानी आदी उपस्थित होते.
‘ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे’
पुणे, ता. ९ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यांत घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका सादर करावी. राज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या ओबीसी समाजाला या निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार शरदराव पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या वेळी नाथा शेवाळे, जनतादल, विठ्ठल सातव, अंबादास कांबळे, दत्ता पाकिरे आदी उपस्थित होते. निवडणुका पावसाळ्यात न घेता सप्टेंबरनंतर घ्याव्यात. निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घोषित झाल्यास या ओबीसींवर अन्याय होणार आहे. या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना योग प्रशिक्षण
पुणे, ता. ९ : ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक, आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य लाभावे, या दृष्टिकोनातून हिरालाल स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट आणि चिरंजीव फाउंडेशनतर्फे निवारा वृद्धाश्रम येथे योग प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी योग प्रशिक्षक डॉ. सुनंदा राठी, विष्णुप्रिया, बापू पडळकर ट्रस्टचे अध्यक्ष आणि पतंजली योगपीठाचे सदस्य रामकुमार राठी, विश्वनाथ बडवे, रवींद्र मराठे, राजीव नातू, सुरेंद्र राठी आदी उपस्थित होते. माया चुत्तर यांनी सूत्रसंचालन केले.
एमपीएससीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा
पुणे, ता. ९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) १२ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा भरतीसाठी जाहिरात दिली होती. या परीक्षेमध्ये नापास झालेल्यांनाही नियुक्त्या दिल्या असल्याचा आरोप करत याबाबत चौकशीचे आदेश काढण्याची मागणी दलित पॅंथर कामगार संघटनेने केली आहे. आदेश न काढल्यास एमपीएससीच्या विरोधात येत्या १२ मे पासून मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष सतीश वाघेला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61664 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..