खासगी कंपनीला विद्यार्थ्यांचा विरोधच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी कंपनीला विद्यार्थ्यांचा विरोधच
खासगी कंपनीला विद्यार्थ्यांचा विरोधच

खासगी कंपनीला विद्यार्थ्यांचा विरोधच

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : खासगी कंपन्यांकडून घेतलेल्या परीक्षांमधील भ्रष्टाचार समोर आला आहे. त्या प्रकरणाचा तपासदेखील पोलिसांकडून सुरू आहे. असे असतानादेखील सरकारला अजून नेमके काय हवे आहे? प्रशासनात प्रामाणिक विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे. मात्र सरकार भ्रष्टाचारी लोकांना नोकरी मिळावी, यासाठी खासगी कंपन्या नेमून अशा लोकांची पद्धतशीर व्यवस्था करत आहे. त्यामुळे पुन्हा खासगी कंपनीच्या माध्यमातून दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब, क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदभरती करण्याच्या निर्णयाचा निषेध करतो, अशी भावना प्रदीप पाटील या विद्यार्थ्याने व्यक्त केली.

राज्य सरकारने सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खासगी कंपनी नेमण्याचा शासनआदेश जाहीर केला आहे. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’ ने प्रसिद्ध केले. त्यावर राज्यातील विद्यार्थ्यांनी त्यांची मते नोंदविली आहेत. या निर्णयाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केला असून पुन्हा ‘खासगी कंपनी नकोच’ असे मत नोंदवले आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या काही निवडक प्रतिक्रिया.

सरकारने सरळसेवेच्या परीक्षा फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)कडूनच घ्याव्यात. आमचा खासगी कंपन्यावर विश्र्वास नाही. त्यामुळे या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा.
- राम भाग्यवंत, विद्यार्थी

खासगी कंपनीमार्फत सरळसेवेची पदभरती करून राजकीय नेत्यांचे आर्थिक हित जोपासण्याचे हे शासकीय धोरण आहे. एमपीएससीने सरळसेवा परीक्षा राबविण्याची तयारी दाखवली असतानाही हा खटाटोप सरकार का करत आहे?
- प्रथमेश पाटील, विद्यार्थी

ऑनलाइन परीक्षा घेऊ नयेत. कारण या अगोदर जे घोटाळे झाले, ते सर्वांना माहीत आहेत. एमपीएससीकडे परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात यावी. नाहीतर मुलांना बेरोजगार राहिल्याशिवाय पर्याय नाही.
- प्रमोद मते, विद्यार्थी, नागपूर

खासगी कंपन्यांनी घातलेला गोंधळ राज्याने पाहिला आहे. तलाठी भरती २०१९, आरोग्यभरती, एमआयडीसी परीक्षा, म्हाडा परीक्षा यामध्ये गोंधळ झाला आहे. बोगस दर्जाचे प्रश्न, प्रश्नपत्रिकांतील चुका, परीक्षा केंद्रावरचा गोंधळ, डमी उमेदवार, पेपरफुटी, प्रशासनातील उच्च पदावरील अधिकारी यांचे लागेबांधे या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत.
- गणेश माळी, विद्यार्थी, बार्शी

सरकारने हा निर्णय रद्द करून केंद्र शासनाच्या धर्तीवर स्वतःचा वेगळा स्टाफ सिलेक्शन आयोग निर्माण करावा. त्यामार्फत दरवर्षी वेळापत्रक जाहीर करून नियमित भरती करावी.
- शैलेश पानखडे, विद्यार्थी, शेवगाव

एमपीएससीकडूनच सर्व पदभरती परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. मात्र शासनाने एमपीएससीच्या पत्राकडे आणि उमेदवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. अशा प्रकारच्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने ती बंद करून पुन्हा तशीच पद्धत आणणे आक्षेपार्ह आहे.
- सुनील सावंत, विद्यार्थी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61708 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top