
पुण्यात वाढणार प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर?
पुणे, ता. ९ : मुंबईच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनाने देखील पुणे स्थानकावरचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्याच्या विचार केला आहे. तसा प्रस्ताव देखील स्टेशन संचालकाकडून देण्यात येत आहे. गर्दीच्या हंगामात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांना एसीपी (अलार्म चेन पुलिंग) केले जाते. त्यामुळे रेल्वेचे होणारे आर्थिक नुकसान प्रवाशांकडून वसूल करण्यासाठी रेल्वे ही दरवाढ करू शकते. मुंबई रेल्वे विभागाने ‘सीएसएमटी’सह अन्य पाच स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करून ते पन्नास रुपये केले आहे. पुणे स्थानकावर देखील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पन्नास रुपये होऊ शकते.
पुणे स्थानकांवर रोज किमान तीन ते चार रेल्वेला साखळी ओढून थांबविल्या जातात. आरपीएफ या संदर्भात गुन्हे दाखल करून कारवाई देखील करते मात्र तरीही साखळी ओढून रेल्वे थांबविण्याच्या प्रकारात घट झालेली नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन रेल्वेचा होणारे आर्थिक नुकसान वसूल करण्यासाठी प्रवाशांच्या खिशातच हात घालत आहे. काही प्रवाशांच्या चुकीची शिक्षा प्लॅटफॉर्मवर नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागणार आहे. तब्बल पाच पट रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार.
२ मिनिटे रेल्वे थांबली तर
४० हजार रुपयांचे नुकसान
धावती रेल्वे जर साखळी ओढून थांबवली तर रेल्वेचे किमान चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान होते. यात डब्यांच्या संख्या किती आहे यावर नुकसानीचा आकडा ठरतो. गाडीला सुरुवातीचा वेग घेण्यासाठी किमान १५ मिनिटांचा वेळ जातो. त्याचा परिणाम पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील होतो. त्यामुळे चैन ओढून रेल्वे थांबविण्याचा नुकसान जास्त आहे.
वाढत्या गर्दीचा व एसीपीचा विचार करता पुणे स्थानकावरचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविणे गरजेचे आहे. या बाबत ठोस निर्णय घेतला नसला तरीही या संबंधीचा प्रस्ताव देत आहे.
- सुरेशचंद्र जैन, स्थानक संचालक, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61711 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..