विद्यार्थ्यांचा आधारवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचा आधारवड
विद्यार्थ्यांचा आधारवड

विद्यार्थ्यांचा आधारवड

sakal_logo
By

विद्यार्थ्यांचा आधारवड...
----------------

विद्यार्थी साहाय्यक समितीचे विश्वस्त रमाकांत तांबोळी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांना, विविध संस्थांमधील सहकाऱ्यांना आणि लोकसंपर्कातील सहाध्यायींना मोठा धक्का बसला. त्यांची दैनंदिनी आणि स्वतःबद्दलचा विश्वास पाहता कोणाचेच मन सरांचे ‘नसणे’ स्वीकारत नाही.
--------
चंद्रकांत कुलकर्णी, विद्यार्थी साहाय्यक समिती
--------------


पंढरपूरचे नवरंगे बालकाश्रम, बारामतीचे रिमांड होम, विद्यार्थी साहाय्यक समिती, सह्याद्री हॉस्पिटल संचालित समवेदना, नगरचे स्नेहालय, वनस्थळी, फ्रान्स मित्रमंडळ, इनव्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट अशा संस्थांसाठी सरांनी काम केले. कामाकडे नोकरी म्हणून न पाहता त्यांच्यातील कार्यकर्ताच त्या-त्या संस्थेशी जोडला गेला. त्यामुळे एवढेच माझे काम, असे न समजता संस्थेच्या प्रगतीसाठी जे जे आवश्यक ते माझे काम अशी त्यांची भूमिका होती.

पर्यवेक्षक म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीत त्यांनी साडेसव्वीस वर्षे काम केले. प्रशासकीय जबाबदारी मिळत असतानाही विद्यार्थ्यांमध्ये काम करायचे म्हणून त्यांनी पर्यवेक्षक पद निवडले. खेड्यापाड्यातून येणारा युवक धडपड्या असतो, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांना बरेच काही साध्य करायचे असते, पण त्याच्या प्रयत्नाला परिस्थिती आड येते. तिथे मदतीसाठी समिती उभी राहते. समितीची वसतिगृहे नुसती लॉजिंग-बोर्डिंग म्हणून ओळखली जाऊ नयेत, तर या वयोगटातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून इथे अनेक उपक्रम सुरू झाले. त्यातील काही उपक्रम सुरू करण्यात तांबोळी सरांचा पुढाकार होता. पालकत्व योजना, विद्यार्थी व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे अवलोकन अशी काही उदाहरणे सांगता येतील. याबरोबरच फोनवर कसे बोलायचे, फोनची डिरेक्टरी कशी पाहायची, बोहरी आळीत कोठे कोणत्या वस्तू स्वस्त मिळतात इतक्या छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनशिक्षण दिले.

तीन वर्षांपूर्वी माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना व्यक्त केल्यावर समितीसाठी काहीतरी उद्दिष्ट घेणार असाल तर, वाढदिवस करा असे सांगितले आणि १ कोटी निधिसंकलनाचे उद्दिष्ट दिले. माजी विद्यार्थ्यांनीही हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरांनीही त्यावेळी अनेक ठिकाणी भेटी देऊन ही संकल्पना सांगितली. विशेष म्हणजे एक वर्षात एक कोटी निधीसंकलन झाले. माजी विद्यार्थी काय करू शकतात, याविषयी त्यांना प्रचंड विश्वास होता.

एखाद्या व्यक्तीचे किती पैलू असू शकतात आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे कशी असतात, असा प्रश्न मला समितीत विद्यार्थी असताना पडला होता. पण गेल्या तीस-बत्तीस वर्षांच्या सहवासात, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन, कर्तव्य कठोरता, सतत नवे शिकण्याची जिज्ञासा, कार्यमग्नता, कामाचे विकेंद्रीकरण, सर्वधर्मसमभाव हे केवळ उक्तीतून नाही तर कृतीतून दाखवणे अशा कितीतरी गोष्टी अनुभवल्या आणि मला उत्तरे मिळत गेली. त्यांना आम्ही व्यक्ती नाही, तर संस्थाच म्हणत होतो. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्वप्नातले कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न, हीच त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61739 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top