
‘ब्रेन इंजिनिअरिंग’ कळायला हवं! : कुलकर्णी
पुणे, ता. ९ : ‘‘अनेक माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आशयाचा (कन्टेट) मारा तुमच्यावर होत आहे. त्यातून तुमची स्वतःची विचारशक्ती खुंटत असेल, तर तुमचे ‘ब्रेन इंजिनिअरिंग’ कोणी करतंय का! हे पाहायला हवे. असे कोणी करत असेल तर ते होऊ द्यायचे की नाही, हे तुमचे तुम्ही ठरवायला हवे,’’ असे मत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून आयोजित ‘दृष्य माध्यमे, इतिहास आणि समाज’ विषयावरील संवादात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. या वेळी कुलकर्णी म्हणाले, ‘‘तुम्हाला आलेल्या ई-मेलला उत्तर काय द्यावे, हेही तेच सुचवतात. याचाच अर्थ तुम्ही काय आणि कसे वागावे, काय विचार करावा हेही अशी माणसं ठरवतात. नफ्यासाठी, राजकीय स्वार्थासाठी याचा वापर होतो. आपण काय प्रकारचा आशय पाहावा हेही तेच सुचवतात आणि त्यातून केवळ एकसारखा विचार करणारे कळप तयार होतात. यातून आपली सृजनशीलता, नवनिर्मिती करण्याची दारे बंद होतात. आपली निसर्गातून आलेली सांस्कृतिक मुळं तुटत असून, सांस्कृतिक कुपोषण सुरू झाले आहे. माणूस घडण्याची प्रक्रिया ही कुटुंब आणि शिक्षणव्यवस्थेतून होते.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61742 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..