
‘आरटीई’ प्रवेशासाठी आज शेवटची मुदत
पुणे, ता. ९ : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत (ता. १०) अंतिम मुदत आहे. निवड यादीतील ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ६१ हजार २८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे या जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रवेशासाठी ३० मार्चला ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यात निवड यादीतील आणि प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून आतापर्यंत दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. आता प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पालकांनी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे.
आकडे बोलतात
- पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमध्ये एकूण जागा - १५ हजार १२६
- विद्यार्थ्यांचे अर्ज - ६२ हजार ९६०
- निवड यादीत - १४ हजार ९५८ विद्यार्थी
- १० हजार ९० - आतापर्यंत प्रवेश
प्रवेशाचा आढावा
जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : आलेले अर्जांची संख्या : निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : प्रवेश निश्चित केलेल्यांची संख्या
औरंगाबाद : ५७५ : ४,३०१ : १७,२२१ : ४,१९३ : २,६२२
नागपूर : ६६३ : ६,१८६ : ३१,४११: ६,१०६ : ४,०८९
नाशिक : ४२२ : ४,९२७ : १६,५६७ : ४,५१३ : ३,१९२
पुणे : ९५७ : १५,१२६ : ६२,९६० : १४,९५८ : १०,०९०
रायगड : २६५ : ४,४६३ : ८,७७८ : ३,८१३ : २,६०५
ठाणे : ६४८ : १२,२६७ : २५,४१९ : १०,४२९ : ६,५८८
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61792 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..