
ब्रह्मनाद संगीत महोत्सव उत्साहात साजरा
स्त्रियांच्या संदर्भातले विवेकानंदांचे
काम दुर्लक्षित ः प्रा मिलिंद जोशी
पुणे ः ‘‘आपल्या पाश्चात्त्य स्त्री शिष्यांकरवी इथल्या स्त्रियांच्या प्रगतीसाठी अत्यंत प्रतिकूल काळात स्वामी विवेकानंदांनी जे काम केले, त्याचे स्मरण भारतीय समाजाला नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. विवेकानंदांचे स्त्रियांच्या संदर्भातले काम दुर्लक्षितच राहिले’’, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. लेखिका रागिणी पुंडलिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुंडलिक कुटुंबीयांतर्फे आयोजित ‘मार्गारेट नोबल (भगिनी निवेदिता) आणि मीरा रिचर्ड (मदर) : भारताशी एकरूप झालेल्या दोन योगिनी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, आश्विन पुंडलिक आणि संजय पुंडलिक यावेळी उपस्थित होते. मोनिका गजेंद्रगडकर यांनी प्रास्ताविकात रागिणी पुंडलिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. संजय पुंडलिक यांनी आभार मानले.
ब्रह्मनाद संगीत महोत्सव उत्साहात साजरा
पुणे ः ‘‘ईश्वराशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संगीत होय’’, असे मत पं. केशव गिंडे यांनी व्यक्त केले. ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आणि ‘संस्कार भारती, पुणे’च्या साहाय्याने आयोजित २१ व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवात गिंडे यांच्या हस्ते पं. शिवदास देगलूरकर यांना ब्रह्मनाद पुरस्कार यांना दिला. त्यावेळी गिंडे बोलत होते. यावेळी विश्व हिंदू प्रचारक दादा वेदक, शाहीर हेमंत मावळे, प्राचार्या रश्मी शुक्ला, नरेंद्र चिपळूणकर, मिलिंद तुळाणकर, राजेश दातार, डॉ. विकास कशाळकर, पं. पांडुरंग मुखडे आदी उपस्थित होते. यावेळी सोपान ऊर्फ काकासाहेब चव्हाण आणि पं. संजय गरुड व रागिणी गरुड यांनाही गौरवण्यात आले. १५ तास चाललेल्या या महोत्सवात सुमारे २०० कलाकारांनी सहभाग घेतला.
ओडिसी नृत्यनाटिकेतून कोरोना काळाचे दर्शन
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘तारीझम-मुंबई’ प्रस्तुत ‘मुहूर्ते जीबना’ या ओडिसी नृत्यनाटिकेतून कोरोना काळातील मानवी जीवनाचे प्रत्यकारी दर्शन घडले. ‘मुहूर्ते जीबना’ म्हणजे क्षणिक जीवन. या क्षणिक जीवनातील विलक्षण, असे क्षण या नृत्यनाटिकेतून उलगडले. भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रा. अमरेंद्र साहू, रीना साहू यावेळी उपस्थित होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत केले. इप्सिता साहू यांनी निवेदन केले. नृत्य गुरू स्तुती साहू आणि रसिका गुमास्ते यांच्या २५ शिष्यांनी सादरीकरण केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
पुणे ः शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या सणस विद्यालयाच्या शालेय समितीचे सदस्य आणि स्नेह वसंत फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर पोकळे, शालेय समितीचे सदस्य संजय मते आणि सहकाऱ्यांनी स्वारगेटजवळील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
डॉ. जनार्दन भोसले यांच्या पुस्तकाला पुरस्कार
पुणे ः ठाणे येथील मराठी साहित्य मंडळातर्फे देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार डॉ. जनार्दन भोसले यांच्या ‘फ. म. शहाजिंदे यांच्या कवितेतील निधर्मीवाद’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी ही घोषणा केली. यापूर्वी डॉ. भोसले यांच्या पुस्तकाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार व एक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही मिळाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61810 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..