
सरहदतर्फे कारगिलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा
पुणे, ता. १० ः पुण्यातील सरहद संस्थेच्यावतीने कारगिलमध्ये येत्या १९ सप्टेंबरला ‘सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, यामध्ये जगातील सुमारे २० देशांमधील स्पर्धक सहभागी होणार आहेत. याशिवाय लडाख पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दलातील सुमारे ३०० धावपटू सहभागी होणार आहेत.
यंदाची ही सरहदची पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आहे. याआधी चार स्पर्धा कारगिलमध्ये घेण्यात आल्या. मात्र या सर्व स्पर्धा राष्ट्रीय होत्या. कोरोनामुळे या चारपैकी एक स्पर्धा व्हर्चुअल, तर एक सिंबॉलिक स्वरूपात घेण्यात आल्याचे स्पर्धेचे मुख्य समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि सदस्य सचिव व सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी सोमवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी या स्पर्धेचे समन्वयक युवराज शहा, कारगिल-पुणे ऑर्चरी ॲकॅडमीचे वैभव वाघ, जगभरातील ६४ देशांतील विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या ‘अॅक्टा’ या संघटनेचे अध्यक्ष मोहाद अली, स्पर्धा संचालक वसंत गोखले, स्पर्धेचे तांत्रिक व्यवस्थापक सुमंत वायकर, वली रहमानी आणि सचिन जामगे आदी उपस्थित होते.
संजय नहार म्हणाले, ‘‘या स्पर्धेसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत, तसेच ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर होणारी ही जगातील महत्त्वाची मॅरेथॉन स्पर्धा ठरणार आहे. विजेत्यांना आठ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला जाणार आहे.’’
------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61839 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..