
शहरातील प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ लवकरच अंमलबजावणी ः महापालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय
पुणे, ता. ९ : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील मोफत पार्किंग बंद करून त्या ठिकाणी सशुल्क पार्किंग करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. यासंदर्भात पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बैठक पार पडली आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहरातील रस्त्यांवर सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्याचे धोरण मंजूर झाले होते. त्यास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळालेली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाल्याने हा प्रस्ताव तत्कालीन महापौरांच्या विचारासाठी पाठविला होता. महापौर व पक्षनेत्यांच्या बैठकीत ‘पे अँड पार्किंग’साठी कुठले रस्ते निवडले जावेत, यावर चर्चा होणार होती. पण, हा निर्णय सर्वच पक्षांना अडचणीचा ठरणार असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता.
शहरात खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले असून पार्किंगचा प्रश्नही निर्माण होत आहे. पार्किंगसाठी शिस्त लागावी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा, यादृष्टीने प्रशासनाने आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रमुख रस्ते कोणते असतील हे अद्याप निश्चित झाले नसले तरी याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट केले आहे.
‘‘शहरातील प्रमुख रस्त्यांवर ‘पेन पार्क’ सुविधा चालू केला जाणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. हे रस्ते कोणते असतील हे अद्याप ठरलेले नाही. पण, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाईल.
-विक्रम कुमार, आयुक्त
‘प्रशासक राज’मध्ये अंमलबजावणी
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ‘पे अँड पार्क’ धोरण तयार केले. पण, त्याची अंमलबजावणी ते त्यांच्या कार्यकाळात करू शकले नाहीत. मात्र, आता महापालिका बरखास्त झाल्यानंतर प्रशासकांच्या माध्यमातून कारभार पाहिला जात असताना, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61841 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..