
पुणे महानगर हद्दीतील ९३ गावांना गावठाण नाही
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) (PMRDA) हद्दीतील सुमारे ९३ गावांना (Villages) गावठाणाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे या गावांमधील रहिवाशांना विकास आराखड्याचा (Development Plan) लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गावांना गावठाणाचा दर्जा द्यावा, अशी विनंती ‘पीएमआरडीए’ने जिल्हा प्रशासनाला केली आहे.
सुमारे आठशेहून अधिक गावांचा समावेश असलेल्या आणि एक हजार ६३८.२१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रारूप विकास आराखडा ‘पीएमआरडीए’ने जाहीर केला आहे. या प्रारूप विकास आराखड्यामध्ये १८ नागरिक विकास केंद्र प्रस्तावित केली आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास योजना नकाशे तयार केले आहे. या शिवाय उर्वरित ग्रामीण भागात आठ ग्रामीण विकास केंद्र प्रस्तावित केली आहेत. या दोन्ही विकास केंद्रातील गावे वगळता ९३ गावांना गावठाणाचा दर्जा दिलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गावांच्या विकासाला मर्यादा आल्या आहेत. परिणामी, या गावांना विकासाच्या दृष्टीने गावठाणाचा दर्जा द्यावा, असे विनंती करणारे पत्र ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
दरम्यान, एखाद्याच्या गावाला गावठाणाचा दर्जा द्यावयाचा असेल, तर त्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत. लोकसंख्येच्या निकषावर तो दर्जा देण्यात येतो.
९३ गावांतील नागरिकांकडून गावठाणाचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी आहे. तसे पत्रही ‘पीएमआरडीए’ने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेतल्यास विकास आराखड्यात बदल करून त्या गावातील नागरिकांना न्याय देता येईल.
- विशाल तांबे, नियोजन समिती सदस्य, पीएमआरडीए
गावाच्या लोकसंख्येनुसार गावठाणाचा दर्जा मिळाल्यास त्याच्या दोनशे ते पाचशे मीटरच्या परिसरात प्रीमिअम शुल्क भरून निवासी बांधकामे करता येऊ शकतात.
- डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए
भरेकरवाडीला गावठाणाचा दर्जा द्यावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. आता आमचे गाव ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत आले आहे. गावठाणाचा दर्जा मिळाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळणार मिळेल.
- गणेश भरेकर, रहिवासी, भरेकरवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61912 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..