महावितरणचे दरमहा एक हजार चेक बाउन्स! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cheque
दरमहा हजार चेक बाउन्स!

महावितरणचे दरमहा एक हजार चेक बाउन्स!

पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे नऊशे ते एक हजार धनादेश अनादरीत (चेक बाउन्स) होत आहे. त्यामुळे अशा ग्राहकांच्या प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे.

ऑनलाइनची सोय असली; तरी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही सुमारे एक लाख नऊ हजार वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. मात्र, त्यापैकी दरमहा सुमारे नऊशे ते एक हजार ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश अनादरित होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुणे जिल्हा ७०० ते ८००, सोलापूर ४० ते ५०, सातारा ३० ते ४०, सांगली ३० ते ४० आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ११० ते १२० धनादेश अनादरीत होत आहेत.

या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये, असे एकूण ८८५ रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करून बिले पाठविण्यात येणार आहेत.

...म्हणून थकबाकी दिसते

धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत आहेत. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली, तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते.

‘भरणा ऑनलाइन करा...’

महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ व मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे, तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे, तसेच क्रेडिट कार्ड वगळता सर्व ऑनलाइनद्वारे होणारा भरणा निःशुल्क आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61922 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top