
जादूगार रघुवीर:
जादुई मायाजालाचा अनभिषिक्त सम्राट!
---------------------
जादूचे प्रयोग स्टेजवर तिकीट काढून सहकुटुंब बघण्यासाठी असतात याची महाराष्ट्रातील लोकांना सवय लावणारे ‘जादूगार रघुवीर'' म्हणजेच माझे आजोबा. मे महिन्यातील २४ तारखेला त्यांची जयंती. पुढील वर्षी जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार असल्याने हा लिखाणाचा प्रपंच.
- जितेंद्र रघुवीर
-------------------
आतापर्यंत ८२ वर्षे, २७ देश फिरून जादूगार रघुवीर यांच्या तीन पिढय़ांनी मिळून १५,८०० पेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. जादूगार रघुवीर यांच्या नंतर विजय रघुवीर, जितेंद्र रघुवीर आणि ईशान रघुवीर (चौथी पिढी) अशा चार पिढय़ा रंगमंचावर जादूच्या मायाजालाची सफर घडवत आहेत.
रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर हे जादूगार घराण्याचे आद्य पुरुष. जन्म २४ मे १९२४. ते मूळचे कादव आणि नंतर चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि अनाथ विद्यार्थी गृहामध्ये (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा शाळेत राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि मग पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना परदेश दौऱ्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. हयातीमध्ये त्यांनी ७ हजार २३ प्रयोग केले.
माणसाचे २ तुकडे असोत, धनुर्विद्या असो किंवा भुतांचा नाच त्यांची सादरीकरणाची एक खास पद्धत होती. अगदी प्रयोगाच्या दरम्यान आजोबा रिकाम्या घागरीमधून ते पाणी काढून दाखवायचे आणि त्या वेळी गंगेची प्रार्थना म्हणत असत. प्रयोग संपेपर्यंत थोडे थोडे पाणी ओतून खाली ठेवलेली बादली भरत असे, हा प्रयोग पण लोकांनी डोक्यावर उचलला.
एकदा पुण्याहून सांगलीला प्रयोगासाठी येताना वाटेत थांबून त्यांनी द्राक्षे घेतली. त्याचे पैसे देण्यासाठी स्टॉलवाल्याकडूनच १ रुपयाचे नाणे घेतले आणि हाताच्या मुठीमध्ये ठेऊन बघता बघता त्याने मागितले तेवढे रुपये त्याच्या ओंजळीमध्ये पाडले, त्याचा आचंबित चेहरा बघून त्याला म्हणाले, ‘ही केवळ हातचलाखी, नजरबंदी आहे, असे पैसे पाडता आले असते तर मला गावोगावी प्रयोग करावे लागले नसते.’’
आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये राधेश्याम महाराज साकारताना त्यामध्ये अचूकता यावी म्हणून अत्र्यांनी पणशीकरांना जादूगार रघुवीर यांच्याकडे जादूचे लहान प्रयोग शिकायला पाठवले होते, अशी आठवण पंतांनी सांगितली होती.
गेले अनेक वर्षे (कोविड काळ सोडून) मे महिन्यात त्यांच्या जयंतीनिमित्त दर वर्षी कार्यक्रम करतो. यंदाही पुण्यात मे १४, १५, १६ तारखेस खास प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे सादर करीत आहोत. जादुप्रेमी रसिकपण तुफान गर्दी करून प्रतिसाद देतात, हीच रघुवीर यांची जादू आणि आशीर्वाद!
---------------
(फोटो- ६३२४९)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61938 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..