संतूरचे भीष्माचार्य हरपले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतूरचे भीष्माचार्य हरपले!
संतूरचे भीष्माचार्य हरपले!

संतूरचे भीष्माचार्य हरपले!

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘‘ज्येष्ठ संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने संतूरचे भीष्माचार्य हरपले आहेत. संतूरला त्यांनी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीत क्षेत्रात अढळपद मिळवलेला ध्रुवतारा आज निखळला,’’ अशा शब्दांत कलाकरांनी पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.

पं. शिवकुमार शर्मा हे संगीत क्षेत्रातील भीष्माचार्य होते. त्यांच्या निधनाने रसिकांसह, कलाकारांसह संतूर या वाद्यालाही दुःख झाले असेल. त्यांनी संतुरवर अखंड प्रेम केले आणि त्याला जगभर पोचवून ओळख निर्माण करून दिली. ते उत्तम तबला आणि व्हायोलिन वादकही होते.
- पं. अतुलकुमार उपाध्ये, ज्येष्ठ व्हायोलिन वादक

संगीत जगतातील अढळपद असलेला हा एक असामान्य कलाकार होता. कलेकरता कला करण्याऱ्या पिढीतील पंडितजी होते. संतूर आणि शिवकुमारजी हे अद्वैत होते.
- पं. सुहास व्यास, ज्येष्ठ शास्त्रीय गायक

ते संगीत क्षेत्रातील हिमालयासम व्यक्तिमत्त्व होते. आपल्या तपश्चर्येच्या जोरावर त्यांनी जगभरात संतूर हे वाद्य पोचवले. पं. भीमसेन जोशी यांचे आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे घनिष्ठ संबंध होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात त्यांनी अनेकदा सहभाग घेतला.
- पं. श्रीनिवास जोशी, पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य

पं. शिवकुमार शर्मा यांच्या जाण्याने आपण एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे. कलाकार म्हणून ते समृद्ध होतेच परंतु, एक विचारवंत, आपुलकी जपणारी व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी संतुरवादनात स्वतःची शैली निर्माण केली.
- राहुल देशपांडे, शास्रीय गायक-संगीतकार

संगीतातील जाणकार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. संतूर या वाद्याची ताकद त्यांनी ओळखली आणि त्यात अनेक बदल केले. तसेच शंभर तारांची संतूर तयार करून क्रांती घडवून आणली. त्यांनी या संपूर्ण वाद्याची निर्मिती केली आणि त्यात नवीन रागही दिले. पं. हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन या जुगलबंदीने कायम रसिकांना आनंद दिला.
- डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक

शास्त्रीय गायनात त्यांनी संतूरला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. संतूर म्हणजे शिवकुमारजी, असेच समीकरण झाले होते. अभिजात संगीतात संतुरला आज जो दर्जा दिला जातो, त्याचे संपूर्ण श्रेय त्यांचे आहे. संगीतातील राग, त्यांचे प्रहर याबद्दलचे त्यांचे विचार काळाच्या पुढचे होते. त्यांच्या तत्त्वांची जपणूक करून त्यांचे कार्य पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- सावनी शेंडे-साठ्ये, शास्त्रीय गायिका

त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कला क्षेत्रातील देदीप्यमान तारा निखळला आहे.
- डॉ. पं. नंदकिशोर कपोते, ज्येष्ठ कथक नर्तक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61997 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top