
शिक्षणाशी व्यवस्थापनाचा साधला मेळ
क्षण बहराचे
................
शिक्षणाशी व्यवस्थापनाचा साधला मेळ
...................................................
मालेगावच्या सुखदा लोढा यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या संस्थासोबत बालविकासासंबंधीचं काम केलं आहे. स्वत: किंवा संस्थेतील कुणी केलेल्या चाकोरीबाहेरच्या प्रयोगांना व्यवस्थापनाची जोड देत मूल्यवर्धन साधणं, यात सुखदाताईंचा हातखंडा आहे.
------------------
व्यावसायिकता, गुणवत्ता व आत्मियता यांचा मेळ दुर्मीळ असतो, पण सुखदाताईंनी आतापर्यंत केलेल्या अनेक कामांमध्ये हेच वैशिष्ट्य ठरलं. त्या म्हणाल्या, ‘‘मी मालेगावची आहे. मानसशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांमध्ये पदवी घेतली. नंतर एमबीए केलं. डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी तरुणांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये आरंभीच्या काळातच सहभागी झाले. त्या अनुभवाने एक नवीन दृष्टी दिली. मग मी माझी बहीण संपदा हिच्याबरोबर आनंदवन हे बालकांसाठीचं केंद्र चालवू लागलो. निधीसाठी कुणावरही अवलंबून राहावं लागू नये, यासाठी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विचार केला. दोन ते आठ या वयोगटातील मुलं शाळा सुटल्यावर या केंद्रात येत असत. आम्ही त्यांचे भाषाविषयक खेळ, कथाकथन, नाटुकली, गणित व कलेचे उपक्रम घ्यायचो. याला जोडून आई- बाबा, आजी - आजोबांच्या कार्यशाळाही बऱ्याच घेतल्या. या कामाचा बोलबाला झाल्यावर मालेगावच्या बालविकास अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण घेण्यासाठी विचारणा केली. शासकीय जाळं विस्तृत आहे. त्या यंत्रणेच सामर्थ्य वापरून नवे विचार, नवे प्रयोग पुढे न्यावेसे वाटले.’’
सुखदाताईंनी स्पष्ट केलं की, या दिशेने आणखी व्यापक काम करण्याच्या इच्छेने मी पुण्यात आले. पुण्यातील शांतिलाल मुथा यांच्या फाउंडेशनतर्फे चालणाऱ्या सामाजिक - शैक्षणिक कार्यात सहभागी झाले. या संस्थेचं काम मेळघाटातील धारणी परिसरात सुरू होतं. शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तीन ते आठ वयोगटातील मुलांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांबरोबर तीन वर्षे काम केलं. या दरम्यान मी या संदर्भातील अनेक संशोधनपर निबंध वाचले. नंतर क्वेस्ट या संस्थेच्या कामात मी सामील झाले. येथे अधिकारी, शिक्षक व सेविकांचा सहभाग असलेले शैक्षणिक प्रकल्पांचा अनुभव घेतला. अॅकेडमिक हेड म्हणून मी काम करते. कोरकू व मराठीतील द्विभाषिक पुस्तकं आमच्या चमूने काढली आहेत.
-----------------
शिक्षण व व्यवस्थापनाचा मेळ घालणं, हे माझं बलस्थान असल्याचं लक्षात आल्याने त्याचा उपयोग या काही संस्थांसाठी आतापर्यंत केला आहे. - सुखदा लोढा
-------------------
मुलांबरोबर शैक्षणिक प्रयोगात रमलेल्या सुखदा लोढा.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62006 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..