
अशी करा गट, गणांची रचना निवडणूक आयोगाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : नवी नियमावली जाहीर
पुणे, ता. १० : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे कामकाज हाती घेतले आहे. हे कामकाज हाती घेताच पुणे जिल्हा परिषदेच्या गटांची आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या गणांची रचना अंतिम करण्याचा तोंडी आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला आहे. शिवाय गट व गणांची रचना अंतिम कशी करावी, या बाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचनाही आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत.
मध्यंतरीच्या काळात निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या अधिकाराबाबतच्या वादामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. परिणामी, त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीतील तरतुदीनुसार पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देता येत नसल्याने प्रशासकांच्या हाती कारभार सोपविण्यात आला. राज्य सरकारच्या कायद्याला आव्हान देत, राज्य सरकारला निवडणुका घेता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत अनेकांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून निवडणूक घेण्याबाबतचे अधिकार अवैध ठरविले आणि राज्यातील मुदत संपलेल्या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया येत्या दोन आठवड्यांत सुरू करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला ४ मे २०२२ ला दिला.
याआधी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने गट व गणांचे प्रारूप आराखडे तयार करून ते १० जानेवारी २०२२ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गट आणि गणांची पुनर्रचना नियमानुसार झाली आहे की नाही, याची खातरजमा करून हे आराखडे जमा करून घेतले होते. या आराखड्यांची सखोल तपासणी केली जाईल. या तपासणीत काही त्रुटी किंवा दुरुस्त्या आढळून आल्यास, त्या कळविल्या जातील, असेही जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगितले होते.
गट, गण रचनेबाबत आयोगाची नवी नियमावली
यानुसार राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे कामकाज दोन दिवसांपासून सुरू केले आहे. यानुसार निवडणूक आयोगाने सोमवारी (ता. ९) पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीतच पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट व गणांची रचना अंतिम करण्यासाठीची पूर्वतयारी करण्याचा आदेश दिला. यासाठी मार्गदर्शक नियमावलीही आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिली आहे.
जिल्ह्यात ८२ गट कायम राहणार
जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गट व गणांचे प्रारूप आराखडे तयार केले होते. यानुसार पुणे जिल्हा परिषदेत सात गट आणि तेरा पंचायत समित्यांमध्ये मिळून १४ गणांची वाढ झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गट व गणांची ही संख्या कायम राहणार की, पूर्वीप्रमाणेच ७५ गट आणि १५० गण राहणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु निवडणूक आयोगाने हा संभ्रम दूर केला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जिल्ह्यात ८२ गट आणि १६४ गण कायम राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62043 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..