
आंबेगाव बुद्रुकमध्ये दोन गटांत तुंबळ मारहाण
पुणे, ता. ११ ः एका मैत्रिणीवरून तरुणांच्या दोन गटांमध्ये जबर मारहाण झाली. या घटनेनंतर आरोपींनी परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली.
याप्रकरणी विशाल सोमवंशी (वय २१) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन आदेश शिळीमकर, अमित थोपटे यांच्यासह आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशालचा भाऊ विनोद सोमवंशी व संशयित आरोपी आदेश शिळीमकर यांच्यात त्यांच्या एका मैत्रिणीवरून भांडणे झाली होती. याच कारणावरून आदेश व त्याच्या साथीदारांनी ही भांडणे मिटविण्यासाठी फिर्यादीस हनुमाननगरमधील शिवशाही चौकात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर कोयत्याने वार केले. तसेच फिर्यादीचा भाऊ विनोद याच्या हातावर वार करुन त्यास लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. दोघांनाही जबर मारहाण करीत त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले.
दरम्यान, याच प्रकरणामध्ये आदेश शिळीमकर (वय २३) यानेही परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, विनोद सोमवंशी, विशाल सोमवंशी, आकाश उणेचा यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश व विनोद यांच्यात त्यांच्या मैत्रिणीवरून वाद झाले होते. संबंधित वाद मिटविण्यासाठी विनोद, विशाल व त्यांचे साथीदार फिर्यादीच्या घराजवळ आले. त्यावेळी संशयित आरोपींनी दहशत माजवून दुकानांच्या दरवाज्यावर दगडफेक केली. कोयते दाखवून दहशत माजविली. दरम्यान, या दोन्ही गटांत झालेल्या जबर मारहाणीच्या प्रकाराने आंबेगाव बुद्रुक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सागर भोसले करीत आहेत.
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62084 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..