
पं. शर्मा म्हणजे सौंदर्याचा उपासक! - पं. विजय घाटे, प्रसिद्ध तबलावादक
पुण्यात झालेल्या एका मैफलीची गोष्ट. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे पं. शिवकुमार शर्मा संतूर वादनासाठी आले होते. मी त्यांना साथ द्यायला होतो. त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांना सांगितले की, मी आता आलाप वाजवतो आहे, तुम्ही सगळ्यांनी तोपर्यंत डोळे बंद करा. पंडितजींनी सुमारे पंधरा-वीस मिनिटे आलाप वाजवला, तोवर सगळ्यांचे डोळे बंद होते. त्यांचे वादन झाल्यावर बहुसंख्य श्रोत्यांच्या डोळ्यांतून अश्रूच वाहत होते. प्रत्येकाला अतिशय तरल व सकारात्मक अनुभव आला होता. स्वर आणि लयीची आगळीवेगळी अनुभूती देण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. शिवकुमारजींच्या कलेमागील सखोल विचाराच्या अनेक उदाहरणांपैकी हे एक उदाहरण.
पं. शिवकुमार शर्मा यांच्या विचारांचा आणि कलेच्या सादरीकरणाचा कल हा असाच नेहमी सौंदर्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असे. प्रत्येक सादरीकरणातून नवा अनुभव देण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे. सौंदर्यावर ते कायम भर देत असत. त्यांच्या वादनातील आक्रमकताही सौंदर्यपूर्ण होती. ‘झाला’सारखे आक्रमक आणि द्रुत प्रकारही वाजवतानाही त्यात नादपूर्ण सौंदर्य असे. त्यांच्या स्वभावात शांतता आणि ऋजुता होती. तीच त्यांच्या वादनातूनही झिरपायची. मात्र, सौंदर्याची उपासना करताना इतर बाबींकडेही ते लक्ष देत असत. त्यांच्या वादनात सखोल विचारही केलेला असे. बुद्धीप्रावीण्याची देणगी त्यांना लाभली होती.
उस्ताद झाकिर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांना ऐकत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतच आम्ही मोठे झालो. मी नंतर जवळपास वीस वर्षे त्यांना साथसंगत केली. अनेक कार्यक्रम आम्ही एकत्र सादर केले. एकत्र वादन करताना वादकांचा विचारही एकच असावा, यावर ते भर देत असत. त्यामुळे संगीतच नव्हे, तर त्यामागील विचाराचादेखील ते आग्रह धरत असत.
संतूर वादनाच्या क्षेत्रातील पंडितजींचे योगदान तर वादातीत आहे. संतूर हे वाद्य तसे बरेच जुने आहे. मात्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात संतुरला स्थान मिळवून देण्याचे अजोड कार्य त्यांनी केले. त्या वाद्याची वादनशैली त्यांनी घडवली. प्रत्येक माणसापर्यंत त्यांनी हे वाद्य पोचवले. सरोद, सतार यांसारखी तंतुवाद्ये वर्षानुवर्षे चालत आली आहेत. त्यामुळे ती वाद्ये वाजवण्याची पद्धत नव्या पिढीला माहिती आहे, त्यावर काय वाजवायचे याची जाण आहे. मात्र संतूर हे कधीच वाजवले न गेलेले वाद्य होते. त्या वाद्यावर शास्त्रीय संगीताला धक्का न पोचता राग कसे मांडता येतील, ताना कशा मांडता येतील, लयकारी कशी पेश करता येईल, याचा स्वतःचा विचार त्यांनी रुजवला. स्वर आणि लयकारीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. संतुरचा उपयोग करून त्यांनी लयकारीला एक वेगळे स्थान दिले.
आजघडीला सगळे कलाकार पंडितजींचा आदर्श ठेवूनच पुढे आले आहेत. भविष्यातही अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे त्यांचे कार्य आहे. ‘या सम हाच’, असा हा कलाकार होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62103 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..