
अतुलनीय कलाकार! - धनंजय दैठणकर, ज्येष्ठ संतूरवादक व पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य
पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला एका विलक्षण उंचीला नेवून ठेवले. त्यांच्यासह एखादा स्वर वाजवण्याची संधी मिळणे, ही देखील एक भाग्याची गोष्ट होती. तथापि, त्यांच्यात अहंकारचा लवलेशही नव्हता. संगीतात सर्वप्रथम तुम्ही शरणागती पत्करली पाहिजे, असा सल्ला पंडितजी देत असत. तुमच्या स्वभावाचे प्रतिबिंब तुमच्या वादनात पडते, असे ते मानायचे. त्यामुळेच पंडितजींना ‘जुगलबंदी’ हा शब्द फारसा पसंत नव्हता. त्यापेक्षा सहवादन हा शब्द वापरण्याला ते प्राधान्य देत. हा त्यांच्या संगीतामागील विचार होता. हाच विचार त्यांना इतरांपेक्षा वेगळा करत असे.
पं. शिवकुमार शर्मा यांचा मला जवळपास चाळीस वर्षे सहवास लाभला. त्यांच्यामुळेच मी या क्षेत्रात आलो. ते अतिशय व्यस्त होते, अशा काळात मी त्यांच्याकडे गेलो. मात्र, तरीही त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले. या क्षेत्राकडे पूर्णवेळ कारकीर्द म्हणून पाहण्यासाठी त्यांनीच मला प्रवृत्त केले. गुरू म्हणून तर पंडितजी महान होतेच, मात्र त्यापलीकडे तत्वज्ञ म्हणूनही त्यांचे रुप मला भावले. ते अतिशय मृदू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा आम्हा शिष्यांच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडला. कोणत्याही प्रसंगाला शांतपणे कसे सामोरे जायचे, हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो.
पंडितजींच्या दीर्घ सहवासामुळे त्यांच्याशी अतिशय हृद्य नाते तयार झाले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती हरपली असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62145 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..