पुण्याशी जोडले सांगीतिक नाते! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याशी जोडले सांगीतिक नाते!
पुण्याशी जोडले सांगीतिक नाते!

पुण्याशी जोडले सांगीतिक नाते!

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे पुण्याशी खास सांगीतिक नाते होते. पुण्यातील असंख्य संगीत मैफिलींमधील त्यांच्या विलक्षण भारावलेल्या वादनाची साक्ष आजही अनेक रसिक देतात. पंडितजींचे वादन ऐकले नाही, असे संगीताचा चाहता पुण्यात सापडणे विरळाच. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील सच्चा सूर हरपल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली.

पं. शिवकुमार शर्मा यांनी पुण्यातील विविध संगीत महोत्सवांमध्ये अनेकवेळा आपली कला सादर केली. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या अगदी प्रारंभापासून ते या महोत्सवाचा भाग होते. त्यामुळे सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी किती वेळा सादरीकरण केले, याची मोजणीही करणे शक्य नाही, असे जाणकार सांगतात. ‘पंडितजींना पुण्यात सादरीकरण करायला अतिशय आवडत असे. पुण्यातील श्रोते जाणकार आहेत, असे त्यांचे मत होते’, अशी आठवण पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य व संतूरवादक दिलीप काळे यांनी सांगितली.

कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
पं. शिवकुमार शर्मा हे संगीत क्षेत्रातील भीष्माचार्य होते. त्यांच्या निधनाने रसिकांसह, कलाकारांसह संतूर या वाद्यालाही दुःख झाले असेल. कारण, त्या वाद्यावर त्यांनी अखंड प्रेम केले आणि त्याला ओळख निर्माण करून दिली. त्यांनी संतूर या वाद्याला जगभरात पोहोचवले आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते उत्तम तबला आणि व्हायोलिन वादकही होते.
- पं. अतुलकुमार उपाध्ये, ज्येष्ठ व्हायोलिन वादक

पं. शिवकुमार शर्मा हे संगीत क्षेत्रात हिमालयासमान व्यक्तिमत्त्व होते. आपल्या तपश्चर्येच्या जोरावर त्यांनी जगभरात संतूर हे वाद्य पोहोचवले. पं. भीमसेन जोशी यांचे आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे घनिष्ठ संबंध होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात त्यांनी अनेकदा सहभाग घेतला. आम्ही जेव्हा भेटायचो, बोलायचे तेव्हा ते आपुलकीने चौकशी करत असत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून येणे कठीण आहे.
- पं. श्रीनिवास जोशी, पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य

पं. शिवकुमार शर्मा हे मला गुरू म्हणून लाभले आणि त्यांच्यासह वादन करता आले, हे माझे खूप मोठे भाग्य आहे. गुरू-शिष्य या नात्यापलीकडे त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग करून घेतले होते. संतूर या वाद्याला त्यांनी एकहाती प्रयत्न करत मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देण्याचे केलेले कार्य अजोड आहे. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक तसेच संगीत क्षेत्राचीही अपरिमित हानी झाली आहे.
- दिलीप काळे, संतूरवादक आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य

पं. शिवकुमार शर्मा यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक शिष्य तयार केले. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कला क्षेत्रातील देदीप्यमान तारा निखळला आहे.
- डॉ. पं. नंदकिशोर कपोते, ज्येष्ठ कथक नर्तक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62158 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top