
महापालिका निवडणूक शाखेच्या प्रशासकीय कामाला येणार गती
पुणे, ता. १० ः पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता महापालिकेच्या निवडणूक शाखेच्या प्रशासकीय तयारीला वेग येणार आहे. निवडणुकीसाठी मनुष्यबळाची गरज असल्याचे त्याचे नियोजन करणे, तसेच आयोगाच्या आदेशानुसार आरक्षणाची सोडत काढणे, मतदार याद्या तयार करणे हे महत्त्वाचे टप्पे असणार आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग आहे. त्यामधून १७३ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुका घेण्यासंदर्भात निर्णय होत नसल्याने महापालिकेच्या निवडणूक शाखेतील कामही मंदावले होते. पण, आता प्रभाग अंतिम झाल्यानंतर आरक्षणाची सोडत काढून महिला प्रभाग, अनुसूचित जाती व जमातींचे प्रभाग निश्चीत केले जाणार आहेत. तसेच, विधानसभानिहाय असलेल्या मतदार याद्या प्रभागनिहाय फोडाव्या लागणार आहेत, त्यावर हरकती सूचना मागवून अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मोठी प्रक्रिया प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे आता प्रशासकीय कामकाजाला गती येणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी सुमारे २५ हजार कर्मचारी आवश्यक आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काही प्रमाणात नियोजन झाले आहे. पण, आता पुढील काळात १७३ प्रभागांमधील सुमारे एक हजारापेक्षा जास्त मतदान केंद्र असणार आहेत. त्यामुळे तेथे मनुष्यबळ द्यावे लागणार आहे.
आठवड्याभरात सोडत शक्यता
अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरही कोणत्या प्रभागातून कोण निवडणूक लढणार, हे आरक्षणाची सोडत काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आयोगाने सोडतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केला नसला, तरी अंतिम प्रभागरचना जाहीर केल्यानंतर आठवड्यानंतर सोडत काढली जाऊ शकेल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62173 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..