
संस्कृतच्या शिक्षणाचे नवे दालन होणार खुले ‘भांडारकर’तर्फे येत्या जूनपासून ऑनलाइन कोर्सची सुरूवात
पुणे, ता. १० : प्राचीन भाषा असलेल्या संस्कृतविषयी अनेकांना आकर्षण असते, तरी क्लिष्टतेच्या भीतीने या भाषेचे शिक्षण घेणे टाळले जाते. मात्र, ही भीती दूर करून सोप्या-सहज पद्धतीने संस्कृत शिकवण्यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने पुढाकार घेतला आहे. येत्या जूनपासून संस्कृत भाषेच्या ऑनलाइन कोर्सची सुरूवात संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.
भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि वसंत कोठारी फाउंडेशनचे राज कोठारी व अशोक कोठारी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत याबाबतीची माहिती दिली. एकूण १२० चित्रफितींचा समावेश असलेला हा कोर्स सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. ‘आपली मातृभाषा शिकताना आपण दैनंदिन व्यवहारातील भाषा आधी शिकतो आणि त्यानंतर त्या भाषेचे व्याकरण शिकतो. हीच पद्धत या कोर्समध्ये वापरण्यात येणार आहे. संस्कृत भाषेची अवाजवी भीती घालवणे हाही या वर्गाचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.borilib.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन पटवर्धन यांनी केले आहे. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीप रावत, प्रदीप आपटे, डॉ. श्रीनंद बापट आदी उपस्थित होते.
या कोर्ससाठी वसंत कोठारी फाउंडेशनने अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. संस्कृत भाषेचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर व्हावा, यासाठी फाउंडेशन विविध संस्थांना पाच कोटी रुपये देणगी देणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भांडारकर संस्थेला या प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे.
-राज कोठारी, वसंत कोठारी फाउंडेशन
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62197 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..