
निरंजन घाटे यांना ‘मसाप’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर किशोर बेडकीहाळ यांना ‘डॉ. कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’
पुणे, ता. ११ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे यांना जाहीर झाला आहे. तर वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ किशोर बेडकीहाळ यांना जाहीर झाला आहे.
परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. या पुरस्कारांचे वितरण येत्या २७ मे रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. रावसाहेब कसबे भूषविणार आहे. परिषदेच्या ११६व्या वर्धापनदिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. घाटे यांनी विविध विषयांवर १९८ पुस्तके लिहिली असून त्यातील १३० विज्ञानविषयक आहेत. तसेच ५००० लेख लिहून मराठीतील विज्ञान साहित्याचे दालन त्यांनी समृद्ध केले आहे. उत्कृष्ट विज्ञानप्रसारक म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
लेखक, संपादक आणि विचारवेध संमेलनाचे संस्थापक असेलल्या बेडकीहाळ यांनी राज्यातील विविध साहित्य चळवळी गतिमान करण्यासाठी दिलेले योगदानाबद्दल त्यांना डॉ. कुलकर्णी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले.
पुरस्कारांच्या रकमेत वाढ
ज्येष्ठ लेखिका आणि भाषा अभ्यासक डॉ. अंजली सोमण यांच्या देणगीमुळे यंदाच्या वर्षापासून ‘मसाप जीवनगौरव पुरस्कारा’च्या रकमेत वाढ करण्यात आली असून पंचवीस हजार रुपये पुरस्कार्थींना देण्यात येणार आहे. तर डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराच्या रकमेत भर घालून त्यांची रक्कम अकरा हजार रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62476 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..