
क्रेडाई पुणे मेट्रोचा कामगारांसाठी पुढाकार
पुणे, ता. ११ः रिअल इस्टेट क्षेत्रात बांधकाम कामगारांच्या आरोग्य आणि कल्याणाला चालना देण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. संस्थेच्या कामगार शिबिर स्पर्धेअंतर्गत आपल्या मजुरांना सर्वोत्तम सुविधा पुरविणाऱ्या विकसकांना ‘बेस्ट फॅसिलिटी अॅवॉर्ड २०२२’चे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सपना राठी यांच्या अध्यक्षतेखाली कामगार कल्याण समिती आणि जे. पी. श्रॉफ यांच्या अध्यक्षतेखाली कुशल विंगतर्फे पुणे विभागातील इतर बांधकाम व्यावसायिक संघटना आणि विकसक सभासदांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात यंदा स्पर्धांमध्ये कामगार संख्येनुसार तीन श्रेणी तयार करण्यात येतील. यामध्ये २१ ते १००, १०१ ते ३०० आणि ३०१ ते त्याहून अधिक कामगार असे वर्गीकरण करण्यात येईल व पुरस्कारांची रक्कमही श्रेणीनुसार वेगवेगळी असेल. तसेच प्रत्येक श्रेणीत एक सुवर्ण आणि एक रौप्य पुरस्कार देण्यात येईल. तसेच काही विशेष श्रेणी पुरस्कारांचा यामध्ये समावेश असून बीओसीडब्ल्यू नोंदणी, आरोग्य व स्वच्छता, निवास व स्वच्छता, कौशल्य विकास, कामगारांची आर्थिक साक्षरता, महिला व कामगार कल्याण, सुरक्षा, नवनिर्मिती व श्रेणी सुधारणा व मजुरांच्या जीवनमानातील सुधारणा या विषयांचा यात समावेश असेल. १९ ऑगस्ट रोजी पुण्यात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. परीक्षकांनी निवड केलेल्या विकसक सभासदांना रोख रक्कम व मानचिह्न अशा स्वरूपात हा पुरस्कार देण्यात येईल.
क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, “मजुरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोने आपल्या विकसक सदस्य व त्यांच्या टीमसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कामगार शिबिरांच्या माध्यमातून स्वच्छतेच्या सर्वोत्तम पद्धती आणि नियमांचे पालन करून काम करणाऱ्या संस्था एक उत्तम उदाहरण निर्माण करतील. सीएसआर उपक्रमाअंतर्गत या स्पर्धा घेण्यात येत असून कामगार कल्याणाच्या दिशेने एक पाऊल पुढे जात आहोत.”
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62516 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..