
पीएमपी अपघातात महिलेसह तरुण जखमी
पुणे, ता. ११ : पीएमपी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बस चालकाने दोन रिक्षा आणि तीन दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिलेसह एक तरुण जखमी झाला. ही घटना कुमठेकर रस्त्यावर विश्रामबाग वाड्याजवळ बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पीएमपीची बस (क्रमांक एमएच-१२ एचबी ०५३६) कोथरूडवरून चितळे चौक, कुमठेकर रस्ता या मार्गे हडपसरच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान विश्रामबाग वाड्यासमोरील आणि चितळे चौक येथील बस थांब्यावरून निघताच बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसचालकाने दोन रिक्षा आणि तीन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. त्यात एका महिलेच्या पायाला दुखापत झाली असून दुचाकी चालकाच्या पायाला मार बसला आहे. या अपघात दोन्ही रिक्षांचे आणि दुचाकींचेही नुकसान झाले आहे. बसच्या धडकेमुळे एक रिक्षा बस आणि भिंतीच्यामध्ये अडकली होती. विश्रामबाग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे अपघात झाल्यानंतर कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून बस चालकाची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निंबाळकर करत आहेत.
बस थांब्यावरून निघताच बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र समोर सिग्नला थांबलेल्या गाड्यांना धक्का लागला. उजव्या बाजूला गर्दी असल्याने बस डाव्या बाजूला वळविली असता, रिक्षा मध्ये अडकली. बसचा वेग अतिशय कमी होता. गर्दी असल्याने खूप भीती वाटली.
- विलास जाधव, पीएमपी चालक
चौकात सिग्नल थांबलो होतो. त्यावेळी अचानक गाड्या पडल्याचा आवाज आला. काही क्षणातच पीएमपीने माझ्या रिक्षाला दाबले. त्यामुळे बाजूच्या भिंत आणि पीएमपीमध्ये अडकलो. चुकून डोके बाहेर काढले असते. तर डोक्याला मार लागून गंभीर घटना घडली असती. या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. पीएमपीने नुकसान भरपाई द्यावी.
- राहुल शेलार, रिक्षा चालक, महम्मदवाडी
सिग्नल थांबलो होतो. त्यावेळी अचानक रिक्षाला धक्का बसला. पीएमपीने धडक दिल्याचे लक्षात आले. सुदैवाने बचावलो. मात्र, रिक्षाचे चांगलेच नुकसान झाले आहे.
- संदेश यादव , रिक्षा चालक, वारजे माळवाडी
बस थांब्यावर थांबलेल्या बसला ओव्हरटेक करून पुढे सिग्नला थांबलो होतो. त्यांनतर अचानक दुचाकीला धडक पाठी मागे धडक बसली. आणि पायाला चांगलाच मार लागल्याने पायाला सूज आली आहे. नशीब चांगले होते की, बसचा वेग हळू होता.
- सौरभ मेहता, दुचाकी चालक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62534 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..