
‘असानी’मुळे पुणेकरांचा उन्हाळा सुसह्य
पुणे, ता. ११ ः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळामुळे पुणेकरांचा उन्हाळा काहीसा सुसह्य झाला आहे. चाळीशीपार जाणाऱ्या कमाल तापमानामुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होत होती. मात्र, सोमवारपासून (ता. ९) कमाल तापमानात लक्षणीय घट होत असून, बुधवारी सरासरी कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
दिवसभर आकाश ढगाळ होते. तर संध्याकाळी पावसाळी वातावरण तयार झाले होते. जणू कोणत्याही क्षणी पाऊस पडेल. मागील चार दिवसात सरासरी कमाल तापमानात चार अंश सेल्सिअसने घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस तरी शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस तरी पुणेकरांना असह्य उन्हाळ्यापासून अंशतः सुटका मिळेल.
विदर्भात लाट कायम
कमाल तापमानात वाढ होत असल्याने विदर्भात उष्ण लाट आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. गुरुवारी (ता. १२) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसेच राज्यात ढगाळ हवामानासह कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर असल्याने विदर्भातील अकोला येथे उष्णतेची लाट आली आहे. विदर्भातील वर्धा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे येथे तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंशांची वाढ झाल्याने नगर येथेही उष्ण लाटेची स्थिती आहे.
‘असानी’ची तीव्रता ओसरली
बंगालचा उपसागरातील ‘असानी’ तीव्र चक्रीवादळ किनाऱ्याजवळ येताच त्याची तीव्रता कमी झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून पुन्हा बंगालच्या उपसागराकडे जाण्याचा अंदाज असून, गुरुवारी (ता. १२) त्याचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. दक्षिण भारतातील राज्य ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी कोसळत असून, महाराष्ट्रातही ढगाळ हवामान झाले आहे.
पुणे शहरातील सरासरी कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
रविवार (ता.८) ः ४०.७
सोमवार ः ३८.६
मंगळवार ः ३७.६
बुधवार (ता.११) ः ३६.३
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62541 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..