
आनंद दिघेंचा जीवनपट उलगडणार
पुणे, ता. १२ : ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल होऊन अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारलेली आनंद दिघे यांची झलक बघून सर्वजण अवाक् झाले. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नव्हे तर दिघे यांच्या नजरेतील ती जरब, चेहऱ्यावरील
तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय.
एका बाजूला कोणत्या ना कोणत्या कारणांनी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा चित्रपट शुक्रवारी (ता. १३) प्रदर्शित होत आहे. सर्वसामान्यांच्या भावना मांडणारा, राजकीय नेत्यांची वेगळी व्याख्या मांडणारा हा चित्रपट प्रत्येकासाठी आदर्श घेण्यासारखाच आहे. तसंच पहिल्याच दिवशी चारशेहून जास्त स्क्रीन्स आणि दहा हजारपेक्षा शोजचं चित्रपटाला मिळाले आहेत.
या चित्रपटाचे निर्माते-अभिनेते मंगेश देसाई, लेखक- दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता क्षितिश दाते याच्यासह झी स्टुडिओज मराठीचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला नुकतीच भेट देत संवाद साधला.
प्रवीण तरडे म्हणाले, ‘‘मी वेगवेगळे विषय असणारे चित्रपट बनवले. शेतकरी, अध्यात्म, इतिहास या विषयांचे चित्रपट बनवल्यानंतर जीवनपट बनवण्याचा विचार होता, पण कोणाच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार हा प्रश्न होता. अखेर धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर मंगेश देसाई यांच्यामुळे चित्रपट काढण्याचे शिवधनुष्य पेलले. झी स्टुडिओमार्फत हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे.’’
प्रसाद ओक म्हणाले, ‘‘आपण या चित्रपटाच्या टिझरमधून एक फार सुंदर वाक्य ऐकलं ते म्हणजे, ‘सर्वच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात.’ मी दिघे साहेब यांच्याबदल खूप वाचलं, ऐकलं. माझ्यासारख्या अभिनेत्याला ९५ चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली, याचा मला आनंद वाटत आहे.’’
कोणत्याही चित्रपटात नेहमी काळ, वेळ आणि प्रारब्ध हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मला कधीही वाटलं नव्हतं, की मी एक निर्माता होईल, परंतु आज माझं भाग्य आहे की आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची संधी मला मिळाली.
- मंगेश देसाई, चित्रपट निर्माते
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62636 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..