
किडनी प्रत्यारोपणप्रकरणी ‘रुबी’सह १५ जणांवर गुन्हा व्यवस्थापकीय संचालक, विधी सल्लागार यांच्यासह तक्रारदार महिलेचाही समावेश
पुणे, ता. १२ : मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणप्रकरणी नामांकित ग्रॅंट मेडिकल फाउंडेशनच्या रूबी हॉल रुग्णालयाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूबी हॉलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रॅंट, विधी सल्लागार ॲड. मंजूषा कुलकर्णी, चार डॉक्टरांसह १५ जणांच्या नावे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेषतः तक्रारदार महिलेचेही नाव या गुन्ह्यात नोंदविण्यात आले आहे.
रूबी हॉल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रॅंट, रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या उपसंचालक रेबेका जॉन, विधी सल्लागार ॲड. मंजूषा कुलकर्णी, कन्सल्टंट नॅफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय सद्रे, युरोलॉजिस्ट डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, अवयव प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी, अमित साळुंखे, त्याची पत्नी सुजाता साळुंखे, अवयवदाता व तक्रारदार सारिका सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथील सारिका सुतार यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी अमित साळुंखे यास स्वतःचे मूत्रपिंड देण्याचे कबूल केले. त्यासाठी साळुंखे यांनी त्यांना १५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. रूबी हॉल रुग्णालयामध्ये २४ मार्च २०२२ रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांनी महिलेस पैसे न देता त्यांची फसवणूक केली. या संदर्भात महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार दिली होती. तसेच रूबी हॉल रुग्णालयानेही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतचा अर्ज कोरेगाव पार्क पोलिसांना दिला होता.
संगनमताने तयार केली बनावट कागदपत्रे
दरम्यान, ऑगस्ट २०२१ ते २९ मार्च २०२२ या कालावधीमध्ये साळुंखे दांपत्य, सारिका सुतार, रवी गायकवाड, अभिजित मदने यांनी संगनमत करून मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी बनावट कागपदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे रूबी हॉल रुग्णालयाकडे सादर केली. संबंधित कागदपत्रांची तपासणी रुग्णालयाच्या सक्षम अधिकारी समितीकडे पाठविली होती. संबंधित समितीच्या सदस्या रिबेका जॉन व सुरेखा जोशी यांनी या कागदपत्रांची सखोल तपासणी केली नाही. ही कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागीय पडताळणी समितीकडे पाठवून संबंधित समितीची दिशाभूल करून त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा कलम १९९४ च्या कलम १० चे उल्लंघन केल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. हा गैरप्रकार रूबी हॉल रुग्णायालयामध्ये झाला असल्याने रुग्णालयाचे डॉ. परवेझ ग्रॅंट हे व्यवस्थापकीय विश्वस्त या नात्याने त्यास जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62780 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..