
राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविणार संभाजीराजे छत्रपती यांची माहिती; स्वराज्य या संघटनेची घोषणा
पुणे, ता. १२ : ‘‘आगामी राज्यसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढविणार असून, सर्व राजकीय पक्षांनी मला पाठिंबा द्यावा. तसेच, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘स्वराज्य’ ही संघटना स्थापन केली असून, जनतेचा कौल पाहून पुढील काळात राजकीय पक्ष स्थापन करण्याचाही विचार आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत सांगितले.
संभाजीराजे म्हणाले, ‘‘यावर्षी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्याचे संख्याबळ पाहता निवडणुकीत भाजपचे दोन तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रत्येकी एक असे पाच राजकीय पक्षांचे उमेदवार असतील. सहाव्या जागेसाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मी राजकारणविरहित समाजाचे हित, गडकोटांचे संवर्धन बहुजन आणि मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिव-शाहूंचा वंशज आणि माझी कार्यपद्धती पाहता सर्व राजकीय पक्षांनी मला अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा. मनाचा मोठेपणा दाखवून पुन्हा राज्यसभेत पाठवावे. त्यासाठी मी सर्वांना भेटणारही आहे.’’
वेळप्रसंगी लोकसभा निवडणूक लढविणार
राजकीय पक्षांपासून दूर का राहता, असे विचारले असता, संभाजीराजे म्हणाले, ‘‘ते लोकांना आवडले नाही, छत्रपती घराण्यात जन्म झाल्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव आहे. मनात काही दाबून ठेवायचे नाही. वेळप्रसंगी माझी लोकसभा निवडणूक लढविण्याचीही तयारी आहे. जे राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी, फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करतात. मग मी शिव-शाहूंचा वंशज असताना ते राजकीय पक्ष मला पाठिंबा देतात की नाही, ते मला पाहायचे आहे.’’
‘‘गोरगरिबांचे कल्याण आणि अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी ‘स्वराज्य’ ही संघटना स्थापन केली आहे. जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी राज्यभर दौरा करणार आहे. राजकीय पक्ष स्थापन करावा, असा सर्वांचा आग्रह होता. परंतु, पहिल्या टप्प्यात ‘स्वराज्य’ ही संघटना स्थापन केली असून, उद्या या संघटनेचा राजकीय पक्ष झाला तरी वावगे समजू नये.’’
- संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62781 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..