
मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक
पुणे, ता. १२ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या मुळामुठा नदी काठ सुधार प्रकल्पावर शहरातील पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतल्याने यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बैठक झाली होती, पण त्यानंतरही पुणे महापालिकेने आक्षेपांवर समाधानकारक उत्तरे दिलेली नसल्याने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच ही बैठक होणार आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नदीचा काठ सुशोभित करण्यासाठी ४७०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्च रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. पण हा प्रकल्प पर्यावरणाच्यादृष्टीने हानिकारक आहे, त्यामुळे त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे, अशी भूमिका पवार यांनी घेतली. त्यानंतर मुंबईत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर पुण्यात राज्य सरकारच्या समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे जलसंपदा, महापालिका आणि पर्यावरण संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीनंतर पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर महापालिकेकडून लेखी उत्तर दिले गेले. पण या उत्तरांमुळे पर्यावरणप्रेमींचे समाधान झालेले नाही.
या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण महापालिकेने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने यावर आता मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
- वंदना चव्हाण, खासदार
तीन चौरस किलोमीटरमध्येच सगळे प्रकल्प का?
वेताळ टेकडी येथून बालभारती ते पौडफाटा हा बोगदा तयार केला तर पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. कर्वे रस्त्यावर एक उड्डाणपूल आहे, आता करिष्मा सोसायटी येथे आणखी एक उड्डाणपुलाचा प्रस्तावित आहे. कोथरूड व परिसराच्या तीन चौरस किलोमीटरमध्येच का सगळे मोठे प्रकल्प आणले जात आहेत. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बोगद्याची गरज नाही, त्यामुळे आमचा यास विरोध आहे, अशी भूमिका पत्रकार परिषदेत प्रदीप घुमारे यांनी मांडली. वंदना चव्हाण हा बोगदा डीपीत दाखवला असला तरी तो चुकीचा वाटत आहे असे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62837 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..