
‘एनएचएआय’चा ४५ हजार वीजग्राहकांना त्रास
पुणे,ता. १२ : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वतीने कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे. परंतु गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या खोदकामामध्ये तब्बल ३५ वेळा महावितरणच्या वीजवाहिन्या तोडलेल्या आहेत. त्यामुळे कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ४५ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हे काम सुरु होण्यापूर्वी महावितरणकडून रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या व संबंधित यंत्रणा स्थलांतरित करण्याबाबत जुलै २०२० मध्ये अंदाजपत्रक मंजूर करून देण्यात आले आहे. हे काम नियमानुसार प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. मात्र प्राधिकरणाकडून वीजयंत्रणा स्थलांतरित करण्यापूर्वीच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले. अंदाजपत्रकानुसार वीजयंत्रणा स्थलांतरित करण्याचे काम सध्या संथगतीने सुरु आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या वारंवार जेसीबीच्या खोदकामात तोडल्या जात आहेत. आठवड्यातून असे तीन ते चार वेळा प्रकार घडत आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ४५ हजार वीजग्राहकांना महावितरणच्या २२/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र खोदकामात तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे विविध भागातील नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी जेसीबीने सुरु असलेल्या खोदकामात गेल्या सहा महिन्यांमध्ये २५ वेळा भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकारांमध्ये विविध परिसरात गेल्या ६ महिन्यांत एकूण सुमारे ४७ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. यासोबतच प्राधिकरणाकडून सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज लाईन) स्थलांतरित करण्यासाठी रस्त्यालगत खोदकाम सुरु आहे. या खोदकामात देखील आतापर्यंत १० वेळा भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत तर विविध ठिकाणी एकूण सुमारे ४० तास वीजपुरवठा खंडित राहिला आहे. महावितरणकडून वीजयंत्रणा वेगाने स्थलांतरित करण्यासाठी प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र या कामास अद्याप गती आलेली नाही.
महावितरणवर नाहक रोष
अनेकदा सायंकाळी किंवा रात्रीच्या कालावधीत खोदकाम करून वीजवाहिन्या तोडल्या जात आहेत. तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरू करणे व वाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस मोठी धावपळ होत आहे. सोबतच वीजग्राहकांचा नाहक रोष सहन तसेच यंत्रणेच्या दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान महावितरणला सहन करावा लागत आहे, असेही महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62853 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..