
इंद्रायणी मेडिसिटीसाठी पर्यायी जागा शोधा
पुणे, ता. १२ ः जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी पर्यायी सरकारी जागेचा शोध घ्या, असा आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी (ता.१२) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व संबंधित प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या प्रकल्पासाठी आळंदी देवस्थानची जमीन ग्राह्य धरण्यात आली होती. परंतु देवस्थानची जमीन अपुरी ठरेल. त्यामुळे देवस्थानऐवजी सुमारे ३०० एकर क्षेत्रापर्यंतची पर्यायी सरकारी जागा शोधा, अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त राव यांना केली होती.
या जागेसाठी विभागीय आयुक्त राव, पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एकत्रित बैठक घ्यावी, अशीही सूचना पवार यांनी केली होती. या सूचनेनुसार विभागीय आयुक्त राव यांनी शुक्रवारी (ता.१२) ही बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी गायरान जमीन किंवा अन्य सरकारी जमीन उपलब्ध दिसत नाही. तरीसुद्धा संबंधित प्रांताधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील सरकारी जागांचा शोध घेण्याचा आदेश देण्यात येईल. यानुसार प्रांताधिकारी उपलब्ध जागांचा अहवाल सादर करतील आणि या अहवालानंतर या प्रकल्पासाठी नेमकी कोणती जागा असावी, हे निश्चित केले जाईल, असे आयुक्त राव यांनी यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांना सांगितले. मात्र या प्रकल्पासाठी प्राधान्याने खेड तालुक्यात जमीन शोधावी, अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी यावेळी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62937 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..